सांगली : सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील; जीवनावश्यक वस्तूंच्या दरात 30 टक्के वाढ | पुढारी

सांगली : सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील; जीवनावश्यक वस्तूंच्या दरात 30 टक्के वाढ

सांगली; विवेक दाभोळे : सन 2014 पासून ते आजअखेर म्हणजे जुलै 2022 पर्यंत महागाईची चढती कमान राहिली आहे. महागाईचा आगडोंब झाला. तर यात अनेकांचे मासिक खर्चाचे बजेट पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. महागाईचा टक्का वाढतच आहे.

सामान्यांना दोन अडीच वर्षांपासून विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. कोरोना, लॉकडाऊनमुळे शेती, व्यापार, उद्योग अडचणीत आले. अनेकांचे रोजगार संपले. बेरोजगारी वाढली, सर्वच समाजघटकांचे मोठे नुकसान झाले. क्रयशक्ती घटत असतानाच जीणे महाग झाले. प्रामुख्याने सन 2014 पासून पाहिले तर जीवनावश्यक वस्तूंचे दर कधीच कमी झालेले नाहीत. उलट त्यात वाढच होत गेली आहे. सामान्यांसाठी कष्टाची भाकरी महाग झाली आहे. भाजीपाला, गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल महागले आहे. सामान्यवर्गीय, शेतकरी यांचे जगणे जिकीरीचे बनले आहे. हायब्रीड ज्वारी, बाजरी, शाळू, मूग, मसूर महाग झाला आहे. हिरवा वाटाणा, गॅस, फळे, मटण, चिकन, मासे जणू चैनीचे बनले आहेत.

पेट्रोल, डिझेल दराचा भडका

मे 2014 मध्ये पेट्रोल 77.48 रु. तर डिझेल 60.43 रु. लिटर होते. आता जुलै 2022 मध्ये पेट्रोल 106.95 तर डिझेल 97.65 रु. लिटर आहे. पेट्रोल आणि डिझेल दरात लिटरमागे अनुक्रमे 29.47 रु. आणि 37.22 रुपये दर वाढ झाली आहे.

गॅस अकराशे पार

सन 2014 मध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा मे महिन्यातील दर 435 रु. होता. सन 2020 मध्ये तो 791 रुपये झाला. तर आता गॅस सिलिंडरच्या दराने हजारी गाठली आहे. एका सिलिंडरचा दर 1155 रु. झाला आहे.
भाज्या महागल्या 30 टक्क्यांनी

2014 मध्ये भाज्यांचे दर

(प्रति किलोचे रुपयात असे) : वांगी – 20, शेवगा- 20, टोमॅटो- 10 ते 12, दोडका- 20, गवारी- 20, हिरवी मिरची-20 ते 30, फ्लॉवर- 15 ते 20, कोबी 5 ते 8, भेंडी 20 ते 30, दुधी भोपळा नग 10 ते 15,

सन 2022 मध्ये भाज्यांचे दर तुलनेने :

(प्रतिकिलो रुपयात असे) : वांगी – 60 ते 70 , शेवगा- 40, टोमॅटो – 30 ते 40, दोडका- 40.

ज्वारी, शाळू, बाजरी, मूग आवाक्याबाहेर

सन 2014 पासून ज्वारी, बाजरी, शाळू, वाटाणा, मूग, मसूर डाळीचे दर भडकले आहेत. कष्टाची भाकरी महाग झाली आहे. 2014 मध्ये हायब्रीड किलोचा भाव 20, शाळू 25, मूग 60, हिरवा वाटाणा 60, बाजरी 30, मसूर डाळ 30 रुपये होती. गहू, गहू 25 रुपये होता. मूगडाळ 80 , तूरडाळ 90, खाद्यतेल 90 रुपये झाले आहे. साखर 20 रु. तर तांदूळ 20 रु होता. मात्र आज याच्या उलटे चित्र आहे. ज्वारी हायब्रीड 30, बाजरी 28, शाळू 35, वाटाणा हिरवा 80, मूग 90, मूगडाळ 100, मसूर डाळ 100 रुपये किलो आहे.

मटण, चिकन, मासे ठरतेय चैन

सन 2014 मध्ये मटणाचा किलोचा भाव 340 रुपये होता. जून 2020 मध्ये तो 600 रुपये झाला. 2014 मध्ये चिकन 70 होते. माशांमध्ये बांगडा 180, सुरमई 350 ते 425 आणि पापलेट 350 च्या घरात किलो होते. आज मटण 600 रु., चिकन 160 ते 180 रु. आहे. आहे. बांगडा 325, सुरमई 400, पापलेटचा दर किलोमागे 450 च्या घरात आहे.

Back to top button