मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क : खासदारांच्या घरावर मोर्चे काढण्याचे अधिकार कुणी दिले? असा सवाल उपस्थित करत शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका. लोकांच्या घरावर आंदोलन करणं आता थांबवा असे आवाहन केले. दीपक केसरकर हे पत्रकार परिषदेत बोलत होते. कोल्हापुरात खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांनी आज मोर्चा काढला. या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला.
आमदार दीपक केसरकर म्हणाले, शिंदेंनी युतीबाबत चर्चा केली होती का, याचं ठाकरेंनी उत्तर द्यावं. राऊतांच्या विधानामुळे केंद्र-राज्य संबंध खराब झाले. केंद्र आणि राज्य यांच्यात संबंध चांगले झाले पाहिजे.
केसरकर पुढे म्हणाले-खासदारांच्या घरावर मोर्चे काढण्याचे अधिकार कुणी दिले? कटकारस्थान मुळात झालंच नव्हतं? आघाडी तोडा हे सांगत होतो, यात कटकारस्थान कसलं?
युवासेनेचे प्रमुख कालपर्यंत कुठेही फिरत नव्हते. आता ते शाखेत फिरु लागले. आज तुम्ही मुंबईत दिसू लागले, असा टोला केसरकर यांनी लगावला आहे.