

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : कुठलीही बँक अगर त्या बँकेतील कर्मचारी जेवणाच्या सुट्टीच्या नावाखाली ग्राहकांना ताटकळत ठेवू शकत नाहीत. माहितीच्या अधिकारात मागितल्यावरून स्वत: रिझर्व्ह बँकेने ही माहिती सार्वजनिक केली आहे.
बँकेतील कर्मचारी एकाचवेळी जेवणाची सुट्टी घेऊ शकत नाहीत. एकेकाने सोयीनुसार अशी सुट्टी घ्यावयाची असते. बँकेच्या कामकाजाच्या एकूण संपूर्ण वेळात सामान्य व्यवहार हा सुरूच राहिला पाहिजे. ग्राहकांना 'लंच ब्रेक'च्या नावाखाली दीड ते दोन तास ताटकळत ठेवणे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. एखादा बँक कर्मचारी जेवणाच्या सुट्टीच्या नावाखाली तुमचे काम ताटकळून ठेवत असेल, तर तुम्ही त्याच्याविरुद्ध बँकेतील तक्रार पुस्तिकेत तक्रार नोंदवू शकता. त्याची दखल घेतली जात नसेल; तर व्यवस्थापक, नोडल अधिकार्यांकडेही तक्रार करता येते. शिवाय, प्रत्येक बँकेत 'ग्रिव्हान्सेस रिड्रेसल फोरम' (तक्रार निवारण मंच) असतात. या मंचाचा फोन नंबर, ई-मेल आयडी तुम्ही बँकेकडून मिळवू शकता. बँकेच्या 'कस्टमर केअर'ला कॉल करून हा नंबर मिळवता येऊ शकतो. बँकेने महिनाभरापर्यंत तक्रारीची दखल न घेतल्यास बँकिंग लोकपालांकडे अपिलात जाता येते.
कर्जाचा अर्ज नाकारल्यास बँकेला कारण द्यावेच लागेल
तुमच्या कर्जाचा अर्ज कारण नमूद केल्याशिवाय बँक रद्द करू शकत नाही. तसे बँकेने केल्यास तुम्ही तक्रार करू शकता.