कोणीही सुपर सीएम नाही; शिंदे हेच नेते : देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार | पुढारी

कोणीही सुपर सीएम नाही; शिंदे हेच नेते : देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा सरकारमध्ये कोणीही सुपर सीएम नसतो. आमच्या सरकारमध्ये कोणीही सुपर सीएम नाही. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आणि आमचे नेते आहेत. काहींना आमची सत्ता आलेली बघवत नाही. त्यामुळे ते टीका करतात, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केला.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सरकार चालवत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. विधिमंडळातील पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी शिंदे यांच्यासमोरील माईक खेचून घेतला, मंत्रिमंडळ बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी शिंदे यांच्याकडे चिठ्ठी सरकवली याबाबतच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर आल्या. तशातच मनसे नेते अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यातून विरोधकांनी फडणवीसांवर टीका केली होती. त्याला फडणवीसांनी उत्तर दिले. सकाळी 9 वाजता कोणी बोलले की त्याचा प्रतिध्वनी 11 वाजता दुसरीकडे उमटत असतो. त्याचाच परिणाम म्हणून मी माईक खेचला, चिठ्ठी दिली अशा बातम्या येतात.

पत्रकार परिषद सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देत होते. अचानक एक प्रश्‍न मला विचारला गेला. त्याचे उत्तर देण्यासाठी म्हणून मी माईक माझ्याकडे घेतला, असा खुलासा फडणवीस यांनी केला. मी माझ्या मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी देण्यात गैर काय? असा सवालही त्यांनी केला.

स्वतःच नेमलेल्या आयोगावर टीका

ओबीसी आरक्षण ज्यांना नको आहे तेच आता टीका करत आहेत. बांठिया आयोगाने 27 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय दिला आहे. पण ज्यांच्या काळात हा आयोग स्थापन झाला, तेच आता टीका करत आहेत. अंतिम टक्केवारीबाबत कोणाचे मतमतांतर असू शकते.पण हा आयोग केवळ राजकीय आरक्षणासाठी आहे. त्यामुळे या संदर्भात जर अधिकचा अभ्यास करायचा असेल तर त्याला आमच्या सरकारची तयारी असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

Back to top button