

मुंबई : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा १८ वर्षानंतर आजही शहराच्या स्मरणात ताज्या आहेत. गोळीबार, स्फोट आणि दहशतीच्या त्या काळात मुंबई पोलिस, सुरक्षा दल आणि एनएसजी कमांडोंनी शौर्याने मुकाबला केला. या लढ्यात मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकातील मॅक्स, टायगर, सुलतान आणि सीझर या चार श्वानांनीही आपल्या तीक्ष्ण घ्राणशक्तीच्या जोरावर कामगिरी बजावली. त्या चौघांनी जगाचा निरोप घेतला असला तरी, मुंबई पोलिस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांची आज आठवण येते.
दहशतवादी हल्ल्याच्या काळात मॅक्सला ताज महाल हॉटेल परिसरात शोधमोहिमेसाठी नेण्यात आले होते. झाडाजवळ पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी असलेल्या भांड्याशेजारी त्याला संशयास्पद बॅग आढळली. मॅक्सने सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी बॅग तपासली. त्यात सुमारे आठ किलो आरडीएक्स, डेटोनेटर्स, बॉल बेअरिंग आणि अन्य स्फोटक साहित्य आढळले. मॅक्सच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर सीझर या श्वानाने परिसरात शोधमोहीम राबवली. त्याने दोन हातगोळे शोधून काढले होते.नरिमन हाऊस येथील दहशतवाद्यांविरोधातील कारवाई-दरम्यानही सीझर नावाचा श्वान हा शोध पथकाचा भाग होता. २००६ च्या रेल्वे बॉम्बस्फोटांनंतर तसेच २०११ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांनंतरच्या तपास मोहिमांतही त्याने सेवा बजावली होती.
टायगर हा काळ्या रंगाचा लॅब्रेडॉर श्वानसुद्धा हल्ल्यानंतर ताज हॉटेलबाहेर सलग आठ दिवस शोधमोहिमेत तैनात होता. स्फोटकांचा शोध घेताना त्याने थकव्याची पर्वा न करता सुरक्षादलांना मदत केली. पुढे पवईतील हिरानंदानी रुग्णालयाजवळ तसेच कांदिवली परिसरात जिवंत बॉम्ब शोधण्याच्या मोहिमेतही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकातील सुलतान या श्वानानेही आपल्या कामगिरीतून महत्त्वपूर्ण योगदान दिले. गोरेगाव येथील बॉम्बशोधक पथकात कार्यरत असताना त्याने प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी स्फोटकांचा शोध घेण्याच्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला. संशयास्पद वस्तू, बेवारस सामान आणि संभाव्य स्फोटकांची तपासणी करण्यासाठी सुलतानची मदत घेतली जात असे.
मुंबई पोलिसांच्या सेवेत अनेक धोकादायक मोहिमा यशस्वीपणे पार पाडणाऱ्या मॅक्स, टायगर, सुलतान आणि सीझर या चारही शूरवीर श्वानांना २०१५ मध्ये निवृत्त करण्यात आले. आयुष्यभर धावपळ, धोका आणि कर्तव्याच्या सावलीत राहिल्यानंतर निवृत्तीचे निवांत दिवस घालवण्यासाठी त्यांची विरार येथील फिझा फार्म्समध्ये व्यवस्था करण्यात आली. तिथे पुन्हा एकदा हे चौघे जुने साथीदार एकत्र आले. मात्र, नियतीला त्यांची ही साथ फार काळ मान्य नव्हती. २०१६ हे वर्ष या चारही शूरवीरांच्या आयुष्यातील अखेरचे ठरले.
८ एप्रिलला मॅक्स, १८ जूनला सुलतान, २३ जुलैला टायगर आणि १३ ऑक्टोबरला सीझरने अखेरचा श्वास घेतला. अवघ्या काही महिन्यांच्या अंतराने चारही साथीदारांनी जगाचा निरोप घेतला. टायगरच्या निधनानंतर सीझर आपल्या लाडक्या साथीदाराच्या मृतदेहाजवळून हलण्यासही तयार नव्हता. मुक्या जीवांमधील मैत्री, जिव्हाळा आणि निष्ठेची ही हृदयस्पर्शी आठवण आजही त्यांच्या देखभाली करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनात घर करून आहे.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान ताज हॉटेलवर गोळीबार सुरू झाल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळाली. त्यानंतर मी मॅक्सला सोबत घेऊन रात्री साडेनऊच्या सुमारास ताज हॉटेल परिसरात पोहोचलो. एका बाजूला बॉम्बस्फोटांचे आवाज येत होते, तर दुसऱ्या बाजूला मॅक्सने आपली शोधमोहीम सुरू केली होती. याचवेळी पडून असलेल्या एका बॉक्समध्ये आरडीएक्सचा साठा आढळून आला. मॅक्सने दिलेल्या सूचनेमुळे मोठा घातपात टळला. मॅक्स आज आपल्यात नसला, तरी त्याने बजावलेले शौर्यपूर्ण कार्य आजही माझ्या डोळ्यांसमोर उभे राहते.
सुभाष गावडे, मॅक्सचे तत्कालीन श्वान हँडलर (सेवानिवृत्त)