

माणगाव : अरुण पवार
माणगाव शहराच्या विकासाच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. शहरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या सांडपाणी व्यवस्थापन, अस्वच्छता, घनकचरा आणि सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने भुयारी गटार योजनेला मंजुरी मिळाली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून सुमारे १५७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याने माणगावच्या नागरी विकासाला मोठे आर्थिक बळ मिळणार आहे.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात केवळ चार तालुक्यांतील नगरपंचायतींमध्ये या योजनेला मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात येत असून, त्यामध्ये माणगाव नगरपंचायतीचा समावेश झाला आहे. त्यामुळे माणगावकरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मात्र, या योजनेच्या मंजुरीचा प्रवास सहज झाला नाही. नगरपंचायतीमध्ये या योजनेच्या ठरावावरून मोठी चर्चा आणि वादंग निर्माण झाला होता.
अखेर नुकताच १० विरुद्ध ६ अशा मतांनी हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. आता राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या हितासाठी या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी होणे महत्त्वाचे ठरणार आहे. माणगाव शहराची लोकसंख्या आणि नागरी विस्तार वाढत असताना सांडपाण्याची विल्हेवाट, नाल्यांची स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचे प्रश्नही गंभीर होत आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील सुमारे ५० वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन भुयारी गटार व्यवस्था उभारण्याची संधी मिळणार आहे. घरगुती आणि व्यावसायिक सांडपाण्याचे संकलन, वाहतूक आणि शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक यंत्रणा निर्माण होऊ शकेल.
सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लागल्यामुळे दुर्गंधी, डास-माशांचा प्रादुर्भाव, जलप्रदूषण आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास अशा समस्यांवर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल. विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना स्वच्छ वातावरणाचा लाभ मिळू शकेल.
या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी मिळवून देण्यासाठी खासदार सुनील तटकरे आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा केला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. राजीव साबळे यांनी सांगितले. माणगावच्या वाढत्या गरजा आणि भविष्यातील नागरी विकास लक्षात घेऊन या योजनेसाठी प्रयत्न करण्यात आले. जागतिक बँकेच्या माध्यमातून १५७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होण्याची संधी निर्माण झाल्याने शहराच्या विकासाला मोठी गती मिळू शकते.
आजच्या पिढीला स्वच्छ शहर आणि उद्याच्या पिढीला आरोग्यदायी भविष्य देण्याची ही ऐतिहासिक संधी आहे. स्वच्छ, सुंदर, निरोगी आणि विकसित माणगावच्या दिशेने पडलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरावे, हीच माणगावकरांची अपेक्षा!
घनकचरा व्यवस्थापनालाही बळ
या प्रकल्पाच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापनालाही चालना मिळणार आहे. शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया आणि शास्त्रोक्त विल्हेवाट यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची संधी उपलब्ध होईल. त्यामुळे रस्त्यांवरील अस्वच्छता, दुर्गंधी आणि सार्वजनिक ठिकाणी साचणाऱ्या कचऱ्याच्या समस्यांवर उपाययोजना करता येतील. स्वच्छ परिसरामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासह पर्यावरणाचे संरक्षणही होणार आहे.