

The Mangani river is gripped by a tangle of trees and shrubs
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवाः अंबड तालुक्यातील मांगणी नदीला झाडाझुडपे व काटेरी बाभळीच्या झाडांनी वेढल्यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह खंडित झाला आहे. पार्श्वभूमीवर नदीच्या स्वच्छतेसह व पाणी साठवण्यासाठी खोलीकरणाची मागणी अंतरवाली सराटी, गहिनीनाथ नगर, वडीगोद्री, कृष्ण नगर, नालेवाडी, गुंडेवाडी व गोंदी येथील शेतकऱ्यांनी केलेली आहे.
तालुक्यात असलेल्या भीषण दुष्काळामुळे पाणी टंचाईची दाहकता जाणवु लागली आहे. खरीप व रब्बी पाण्याअभावी हातातून गेले. या पार्श्वभुमीवर मांगणी नदी, सुखी नाला, लेंडी नदीच्या स्वच्छतेची व खोलीकरणाची कामे प्रशासनाने तत्काळ करावेत अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
तालुक्यातील दुनगाव, टाका आदी गावांत नोव्हेंबरला महिन्यातच टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यात शेती आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. केवळ तात्पुरत्या पाणीपुरवठ्यावर विसंबून न राहता उपलब्ध जलस्रोताचे पुनर्जीवन करणे आणि नैसर्गिक प्रवाहांना मोकळा श्वास देणे आणि जलसाठा वाढवणे आदी दुष्काळी भागात कामे महत्त्वाची आहेत.
वडीगोद्री व अतरवाली सराटी परिसरातील मांगणी नदीतील गाळ काढणे व नदीच्या पात्राचे रुंदीकरण व खोलीकरण करावे अशी अपेक्षा शेतकऱ्याकडून व नागरिकांनी व्यक्त केली आहे. मांगनी नदी, सुखी नाला व लेंडी नाल्याची दयनीय अवस्था झाली आहे. मोठ्या प्रमाणात नदी व नाल्यांमधे गाळ व काटेरी बाभळीचे झाडे वाढली आहेत.