पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची रविवारी पहाटे 2.30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होत आहे. कोरोनानंतर निर्बंधमुक्त आषाढी यात्रा भरली आहे. त्यामुळे 10 लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झालेले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत दोन वर्षे आषाढी यात्रेचे पायी पालखी सोहळे रद्द करण्यात आले होते. केवळ परंपरा जपण्यासाठी मानाच्या दहा पालख्या एस.टी. बसने थेट पंढरपुरात आणल्या गेल्या होत्या. श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली होती. कोरोनानंतर दोन वर्षांनंतर प्रथमच आषाढी यात्रा पायी पालखी व दिंडी सोहळा साजरा होत आहे.
रविवारी पहाटे 2.30 ते 4.30 या वेळेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा होणार आहे. पहाटे 5.30 वा. पंढरपूर देवस्थान मंदिर परिसर येथे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन, तर पहाटे 5.45 वा. पंढरपूर देवस्थान मंदिर परिसर येथे नदीघाटाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. 11.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर जिल्ह्यातील 'सुंदर माझे कार्यालय' या स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे.
दुपारी 12.30 वा. पंढरपूर येथे शिवसेना पक्षाच्या मेळाव्यास मुख्यमंत्री शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ते शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.