श्रीरामपूर पालिकेत रंगणार तिरंगी लढत! | पुढारी

श्रीरामपूर पालिकेत रंगणार तिरंगी लढत!

श्रीरामपूर : चंद्रकांत वाक्चौरे : संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या श्रीरामपूर नगर पालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. येत्या 18 ऑगष्ट रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, होवू घातलेल्या या निवडणुकीत तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होत आहे. गेल्यावेळी 16 प्रभागांमध्ये 32 नगरसेवक होते, मात्र यावेळी रेल्वे रुळापलिकडे वार्ड क्र. 2 मध्ये 1 प्रभाग वाढल्याने आता नगरसेवकांची संख्या 34 झाली आहे. सर्वात मोठी अशी बिरुदावली असलेल्या या पालिकेच्या रणांगणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

श्रीरामपूर पालिकेत आदिक, ससाणे व आ. लहु कानडे- अंजुमभाई शेख असे तीन वेगवेगळे गट असल्याने तिरंगी लढतीचे चित्र अधोरेखित होत आहे. सध्या एकमेकांच्या कार्यक्रमांना हजेरी लावणारे, समर्थक दिसणारे माजी नगरसेवक ऐनवेळी कोणत्या गोटात सहभागी होणार, त्यांची नेमकं काय भूमिका असणार, हे चित्र मात्र संदिग्ध व धुसर दिसत आहे.

गेल्यावेळी (2016) च्या निवडणुकीत श्रीरामपुरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा आदिक यांच्या बाजुने कौल दिल्याने त्यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली होती. स्वतः अनुराधा आदिक यांच्यासह आकसा पटेल, तरन्नुम जहागिरदार, प्रणिती चव्हाण, शितल गवारे, राजेंद्र पवार, स्व. बाळासाहेब गांगड यांचे चि. सोमनाथ गांगड तसेच प्रकाश ढोकणे आदींचा स्वतंत्र गट या निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहे.

या पालिकेत मुख्यत्वे काँग्रेस दोन गटांमध्ये विभागली आहे. माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे व आ. लहु कानडे- अंजुमभाई शेख असे हे परस्पर विरोधी दोन गट निर्माण झाले आहेत. ससाणे गटात स्वतः ससाणे यांच्यासह माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे, भारती परदेशी, आशा रासकर, मनोज लबडे, निलोफर शेख, मिरा रोटे आदींचा समावेश आहे.

काँग्रेसच्या दुसर्‍या गटात आ. लहु कानडे यांच्यासह कनिष्ठ बंधू अशोक (नाना) कानडे हे नव्याने अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेल्या प्रभाग क्र. 5 किंवा 11 मधून मोर्चे बांधणी करीत आहेत. त्यांच्या बाजुने माजी उपनगराध्यक्ष अंजुमभाई शेख यांच्यासह पत्नी समिना शेख तसेच राजेश अलघ, रविंद्र गुलाटी, मुक्तार शहा, जायदाबी कुरेशी, जयश्री शेळके आदींचा सवता सुभा ही रणधुमाळी गाजविणार असल्याचे बोलले जात आहे.

तिसरीकडे गेल्यावेळी महाविकास आघाडीकडून कट्टर विखे समर्थक स्नेहल केतन खोरे निवडून आल्या होत्या. त्यांच्यासह भारती कांबळे, रवी पाटील, दीपक चव्हाण, वैशाली चव्हाण यांनीही नगरसेवकपदी बाजी मारली होती. भाजपकडून आता नव्याने ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, शहराध्यक्ष मारुती बिंगले आदी उमेदवारी करु शकतात, असे चित्र दिसत आहे.
ऐनवेळी रणनिती बदलून कोण-कुणाच्या गोठात सामील होईल, हे मात्र तेव्हाची वेळच ठरवेल, असे दिसते.

Back to top button