उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा गैरफायदा घेतला : आदित्य ठाकरे | पुढारी

उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा गैरफायदा घेतला : आदित्य ठाकरे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्या आजारपणाचा गैरफायदा घेत त्यांनी धोका दिला, घात केला, असा आरोप शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांवर केला.

शिंदे समर्थक आमदार यामिनी जाधव यांच्या भायखळा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला सुरुवात झाली. भायखळा येथील शाखा क्रमांक 216 ला भेट देत आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. माझी निष्ठा यात्रा कोणाच्या विरोधात नाही. बंडखोरांचे आमच्यावर काय प्रेम आहे ते पाहतोच आहे. त्यामुळेच त्यांनी धोका दिला असेल. उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत हा धोका दिला गेला आहे. कुणालाही लक्ष्य करणे ही आमच्या कामाची पद्धत नाही.

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात माझी निष्ठा यात्रा जाणार आहे, असे आदित्य यांनी यावेळी सांगितले. मातोश्रीवर जे येत आहेत त्यांच्या निष्ठा आम्हाला माहीत आहेत. महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभा आहे. ज्यांनी धोका दिला त्याचे दुःख आहेच. त्यांच्या चेहर्‍यावरील भाव पाहून आमच्यासारख्या चांगल्या लोकांना राजकारणात जागा आहे का, असा प्रश्न आता पडला आहे. ज्यांच्यावर विश्वास टाकला, ज्यांना आम्ही सर्व काही दिले त्यांनीच आम्हाला धोका दिला, असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा

Back to top button