शेअर मार्केटमध्ये दाम दुप्पट करून देतो, असे सांगून आठ लाखाना गंडा : दोघांवर गुन्हा दाखल | पुढारी

शेअर मार्केटमध्ये दाम दुप्पट करून देतो, असे सांगून आठ लाखाना गंडा : दोघांवर गुन्हा दाखल

विटा : पुढारी वृत्तसेवा

आळसंद (ता.खानापूर) येथील एका व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये ११ महिन्यात दामदुप्पट रक्कम मिळवून देतो असे सांगून सातारा जिल्ह्यातील पिता पुत्रांनी तब्बल ८ लाख ७ हजार ५०० रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित सुरज पांडूरंग जाधव आणि पांडूरंग एकनाथ जाधव (रा. गुरसाळे, ता.खटाव, जि. सातारा) या पिता-पुत्रावर विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.

याबाबत शिवराज बाळासाहेब भोसले यांनी फिर्याद दिली आहे. विटा पोलिसांनी सांगितले की, आळसंद (ता.खानापूर) येथील शिवराज भोसले यांच्या मित्राची गुरसाळे येथील सुरज आणि पांडूरंग जाधव या पिता-पुत्राशी ओळख होती. त्यातूनच भोसले आणि संशयित सुरज या दोघांचा फोनवरून संपर्क होऊ लागला. त्यावेळी सुरजने आपण शेअर मार्केटचे काम करत असून मुंबईतील खारघर येथे कार्यालय असल्याचे सांगितले. आमच्याकडे लोकांनी सुमारे ४ कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. तुम्ही ही गुंतवणूक करा, तुम्हाला ११ महिन्यात सर्व रक्कम दामदुप्पट देतो असे आमिष संशयितांनी भोसले यांना दाखविले.

या आमिषाला बळी पडून भोसले यांनी १० जानेवारी २०२१ ते ६ एप्रिल २०२१ या काळात जाधव पिता-पुत्राला स्टेट बॅँकेच्या विटा शाखेतून धनादेशाव्दारे ५ लाख रूपये आणि त्यानंतर वेळोवेळी रोख स्वरूपात ३ लाख ७ हजार ५०० असे एकूण ८ लाख ७ हजार ५०० रूपये दिले. या रक्कमेची ११ महिन्याची मुदत संपल्यानंतर भोसले यांनी पिता-पुत्राकडे त्यांनी गुंतवणूक केलेली दामदुप्पट रक्कम मागितली. त्यावेळी या पिता-पुत्राने वेगवेगळी कारणे सांगून त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिवराज भोसले यांनी पोलिसांत सुरज पांडूरंग जाधव आणि त्याचे वडील पांडूरंग एकनाथ जाधव या पिता – पुत्राविरूध्द ८ लाख ७ हजार ५०० रूपयांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा!

Back to top button