नगर : अहो, आश्चर्यम्… चक्क मृत महिलेवर उपचार | पुढारी

नगर : अहो, आश्चर्यम्... चक्क मृत महिलेवर उपचार

अकोले : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील अतिदुर्गम साम्रद आरोग्य उपकेंद्रात वर्षापूर्वी मृत पावलेल्या भीमाबाई भीका रंगडे या महिलेवर समुदाय आरोग्य अधिकारी अविनाश पवार यांनी कागदोपत्रीच उपचार केल्याची दप्तरी नोंद आढळल्याने या अनागोंदी कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, चक्क खोट्या रुग्ण तपासणीचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने आदिवासी भागातील रुग्ण सेवेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दि. 29 जुन 2021 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई सहसंचालक डॉ. विजय कदेवाड यांनी शासनाच्या परिपत्रकात समुदाय आरोग्य अधिकारी यांनी दररोज दुपारच्या सत्रात दुपारी 1.30 ते सायं. 5 वाजण्याच्यादरम्यान दुर्गम आदिवासी भागात 10 घरांना व इतर भागामध्ये 20 घरांना भेटी द्याव्या. या भेटी दरम्यान समुदाय आरोग्य अधिकार्‍यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींची रक्तदाब व रक्तातील साखरेची तपासणी करावी. समुपदेशन करावे. जनतेला 13 प्रकारच्या आरोग्यसेवा उपलब्ध करुन देणे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयातून निदान होऊन आलेल्या असंसर्गजन्य रुग्णांना दिलेल्या औषधोपचारानुसार औषध पुरवठा करणे, यासाठी उपकेंद्र स्तरावर समुदाय आरोग्य अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आले. आरोग्यवर्धिनी केंद्रात व्यवस्थापकीय कामे पाहणे आदींचा समावेश आहे. अशा समुदाय आरोग्य अधिकार्‍यांना कर्तव्य व जबाबदार्‍या शासनाने नेमून दिल्या आहेत.

अधिकारी फिरकतच नाहीत

बंहुतांश आदिवासी भागातील आरोग्य उपकेंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी फिरकतच नाहीत. जगप्रसिद्ध सांदण व्हॅली या पर्यटनस्थळी साम्रद आरोग्य उपकेंद्र आहे. या उपकेंद्रामध्ये बाह्य रुग्ण तपासणी मोठ्या प्रमाणावर दाखविण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी अविनाश पवार यांनी साम्रद गावातील भीमाबाई भीका रगडे या 18 ऑगस्ट 2021 रोजी मृत झाल्याची नोंद या उपकेंद्रातील मृत्यू नोंद रजिस्टरला आहे. मात्र, चक्क मृत्यू पावलेल्या महिलेवर देखील कागदोपत्री 5 एप्रिल 2022 रोजी बाह्यरुग्ण तपासणीमध्ये सर्दी व डोकेदुखीवर उपचार करण्यात आल्याची नोंद रजिस्ट्ररला करण्यात आली आहे. विशेष असे की, आरोग्य विभागाच्या तपासणीत मृत महिलेवर उपचार केल्याचे लक्षात आल्यावर रुग्ण तपासणी रजिस्टरवर खाडाखोड करण्याचे कामही संबंधिताने केल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. चोळके यांनी साम्रद आरोग्य उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी अविनाश पवार यांना मृतावर उपचार केल्याचे कागदोपत्री प्रकरणी नोटीस देऊन सूचना केल्याचे डॉ. चोळके यांनी सांगितले.

मृत महिलेचे नाव बाह्य रुग्ण तपासणीच्या यादीमध्ये घेणे चुकीचे आहे. अधिकार्‍यांची दिशाभूल करण्याकरिता रुग्ण तपासणी दाखविण्यात आली आहे. असे पुन्हा होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येऊन समुदाय आरोग्य अधिकारी अविनाश पवार यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

                                    – श्याम शेटे, तालुका आरोग्याधिकारी, पंचायत समिती, अकोले.

Back to top button