मुंबई : ‘लावण्य जलसा’ ने लोकरंग महोत्सवाचा शुभारंभ ! | पुढारी

मुंबई : ‘लावण्य जलसा’ ने लोकरंग महोत्सवाचा शुभारंभ !

मुंबई : पुढारी वृत्तसेवा बाहेर मुसळधार पाऊस असताना परळच्या दामोदर नाट्यगृहात टाळ्या आणि शिट्यांचा जोरदार पाऊस सुरू होता. गण, गौळण, लावणी, भारुड आणि त्याच्या जोडीला असलेले खुसखुशीत निवेदन…ढोलकीवर थिरकणारी बोटे आणि लावण्यवतींच्या अदाकारींनी उपस्थितांची मने जिंकली जात होती. हे चित्र होते सोमवारी रात्री महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यासाच्या लोकरंग महोत्सवातले. शहरात प्रचंड कोसळणार्‍या पावसाची तमा न बळगता खचाखच भरलेल्या दामोदर नाट्यगृहात तीन दिवसीय महोत्सवाचा शुभारंभ झाला.

पन्नास वर्षांपूर्वी ‘नाव मोठं दर्शन खोटं’, या मराठी चित्रपटातील गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या या रावजी बसा भावजी या आशा भोसले यांच्या सुस्वर आवाजातील ठसकेबाज लावणीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. सुरेखा पुणेकर यांनी ही लावणी लोकमाणसात नेली. तीच लावणी या कार्यक्रमात तेवढ्याच ढंगात गायकांनी गायली आणि नृत्यांगनांनी कुशलतेने सादर केली.

अभिनेत्री वर्षा संगमनेरकर, विजया पालव, लावणी अदाकारा उल्का दळवी, उर्मिता डेव्हीड, गीतांजली सावंत, स्नेहा कदम, मृणाली दवंडे, स्वीटी लोखंडे, शिवानी पवार यांच्या सोबत नृत्य दिग्दर्शक अमित घरत यांनी सादरीकरण केलेला लावण्य जलशाचा प्रेक्षक मनमुराद आनंद लुटत होते. अभिनेते पराग चौधरी व प्रा. अभिजीत पवार यांच्या निवेदनालाही तितकीच दाद मिळत होती.

समीर लाड, गौरव दांडेकर, अनया सावंत, ब्रह्मनंदा पाटणकर आणि वंदना निकाळे यांनी गायनाची बाजू अप्रतिम सांभाळली. तर सुनील मेहेतर, संदीप हरियाण, राजू शेरवाडे, संतोष कदम, धीरज गोरेगावकर, शिवाजी बनसोडे यांनी वाद्यवृंदात रंगत आणली. सुनील देवळेकर यांची नेपथ्य व प्रकाशयोजना, बबलू तोडणकर यांचे व्हिडियो ग्राफिक्स, सतीश पाध्ये यांच्या डिझाईन्स, सुशील सावंत यांचे ध्वनितंत्र ही या लोकरंग महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या जमेची बाजू होती. कार्यक्रमात शिवसेना नगरसेवक अमेय घोले, शिवसेना नगरसेविका उर्मिला पांचाळ, डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. परिणीता सावंत यांचा सत्कार झाला. खा. हेमंत पाटील, गोदावरी समूहाच्या राजश्री पाटील, नगरसेवक अमेय घोले, नगरसेविका उर्मिला पांचाळ, गोपाळ शेलार, प्रशांत काशीद, दिनेश बोभाटे, प्रवीण देसाई, सचिन शेट्ये, संजय आंबोले, अनिल दादा चव्हाण, यांचे सहकार्य महोत्सवास लाभले.

महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यास

मराठी लोककला व लोकपरंपरा यांचे संवर्धन व्हावे, पुढच्या पिढीला हा ठेवा लक्षात राहावा म्हणून महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यासाच्या वतीने, कार्यकारी विश्वस्त संतोष परब यांच्या पुढाकाराने आणि सायली परब यांच्या संकल्पनेतून या लोकरंग महोत्सवाचे आयोजन 2001 पासून करण्यात येते. यंदाचे महोत्सवाचे 22 वे वर्ष असून दैनिक पुढारीच्या विशेष सहभागातून संपन्न होत आहे.

आज काय पहाल ?

कोल्हापूर जिल्हा ग्रामस्थ प्रतिष्ठानच्या सहकार्याने आज या महोत्सवात अभिनेता पराग चौधरी दादा कोंडके यांचा अभिनय ‘सोंगाड्या’ या कार्यक्रमाद्वारे पेश करून शाहीर कोंडके यांच्या स्मृतींना उजाळा देतील. दामोदर नाट्यगृहात रात्री साडेआठला हा कार्यक्रम सुरू होईल.

हेही वाचा

Back to top button