Video: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग; वाहतुकीवर परिणाम | पुढारी

Video: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग; वाहतुकीवर परिणाम

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: मुंबई शहर व उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अंधेरी मिलन सबवेसह सखल भागात पाणी तुंबू लागले आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्याही दहा ते पंधरा मिनिट विलंबाने धावत आहेत. समुद्राला मोठी भरती नसल्यामुळे हिंदामाता व गांधी मार्केट सायन येथे तुंबलेल्या पाण्याचा तातडीने निचरा झाला.

मुंबई पावसाची संततधार सुरू असून अधून मधून पडणाऱ्या पावसाच्या जोरदार सरीमुळे सखल भागात पाणी तुंबू लागले आहे. १० ते १५ ठिकाणी झाडे कोसळली असून दोन ते तीन ठिकाणी शॉर्टसर्किटच्या किरकोळ घटना घडल्या. जोरदार पावसामुळे शहरातील नदी-नालेही पाण्याने भरून वाहू लागले आहेत. मिठी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. अंधेरी मिलन सबवेत पाणी तुंबू लागल्यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पावसामुळे रस्त्यावरील वाहनांचा वेगही मंदावला आहे. त्यामुळे ठीकठिकाणी वाहतूक कोंडी दिसून येत आहे.

दादर, अंधेरी, भायखळा व अन्य मार्केटमधील खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही रोडावली आहे. रस्त्यावरील फेरीवाल्यांची संख्याही तुरळक दिसत आहे. सकाळी शाळेत निघालेल्या मुलांचेही पावसामुळे हाल झाले चाकरमानीही ओले चिंब भिजून आपल्या कार्यालयात पोहोचले. बेस्टच्या बसही उशीरा धावत आहेत. पावसामुळे रस्त्यावरील नागरिकांची वर्दळही कमी झाली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button