नागपूरमध्‍ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत : मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती | पुढारी

नागपूरमध्‍ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत : मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपूर विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. राज्यातील सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच फडणवीस नागपुरात आले असता त्‍यांच्‍या स्‍वागतासाठी कार्यकर्त्यांनी विमानतळावर मोठी गर्दी केली. ढोल ताशे बॅन्डच्या आवाजात फडणवीस यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.

देवेंद्र फडणवीस हे पत्नी अमृता फडणवीस याच्यांसह आज मंगळवारी सकाळी नागपुरात आले. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात हिंदुत्वाच्या आधारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप- शिवसेना युती सरकार सत्तारुढ झाले. साेमवारी विधानसभेत अध्यक्ष निवडीवेळी तसेच विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी भाजपाचे दोन आमदार आजारी असल्यामुळे सभागृहात अनुपस्थित असतानाही १६४ आमदारांचा पाठींबा असल्याचे फडणवीस यांनी दाखवून दिले.

विमानतळापासून फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत रॅली

आज विमानतळापासून फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत रॅली काढण्यात आली. रस्त्यात ठिकठिकाणी स्वागताचे पोस्टर, बॅनर कमानी लावण्यात आल्या. काही पोस्टरवर देवेंद्र फडणवीस यांचा देवमाणूस म्हणूनही उल्लेख करण्यात आला. यावेळी फडणवीस यांचा त्याग अधोरेखित करणारे अभिनंदन पर पोस्टर सर्वत्र झळकत होते.

नवीन भाजप- शिवसेना सरकारचे शिल्पकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे धडाडीचे, लाडके, कार्यकर्ता आणि जनतेची नाळ ओळखणारे नेतृत्व आहे. आत्ताचे सरकार आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अपार कष्ट उपसले, तरीही केवळ पक्षाचा आदेश शिरसावंदय मानुन उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली. पक्षाशी बांधीलकी काय असते? हा आदर्श पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी कायमच लक्षात ठेवला पाहीजे, असा संदेश यावेळी देण्यात आला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button