हिमाचल प्रदेश : कुल्लू येथे बस दरीत कोसळून शाळकरी मुलांसह १२ ठार | पुढारी

हिमाचल प्रदेश : कुल्लू येथे बस दरीत कोसळून शाळकरी मुलांसह १२ ठार

पुढारी ऑनलाइन डेस्क : हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात शाळकरी मुलांसह १२ जणांचा मृत्यू झाला. कुल्लूमधील सेंज व्हॅलीमध्ये सकाळी ८ वाजता हा अपघात झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता जिल्हा आयुक्तांनी व्यक्त केली आहे.

निओली-शंशेर मार्गावरील जंगला गावाजवळ सेंजला जाणारी बस सकाळी ८ वाजता दरीत कोसळली. या बसमध्ये शाळकरी मुलांसह सुमारे २० प्रवाशी प्रवास करत होते. कुल्लू जिल्ह्यातील अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत असल्याचे कुल्लूचे उपायुक्त आशुतोष गर्ग यांनी सांगितले. केंद्र सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

मृतांचा आकडा वाढू शकतो

बसमध्ये अंदाजे 20 लोक होते. मदत आणि बचाव कार्यासाठी प्रशासनाचे पथक घटनास्थळी आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढू शकतो, असे जिल्हा आयुक्तांचे म्हणणे आहे.

पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, की हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे झालेला बस अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या दुःखाच्या काळात मृतांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. मला आशा आहे की जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे होतील.

Back to top button