

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी आपला पदभार स्वीकारला. त्यांनी आपल्या दालनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमा लावल्या असून त्यांना साक्षी मानून ते आता राज्याचा कारभार हाकणार आहेत.
पदभार स्वीकारण्यासाठी मंत्रालयात दाखल झाल्यानंतर शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री दालन गाठले. त्यांच्या दालनाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. त्यांचे प्रवेशद्वारावर राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी स्वागत केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर कोरोनाची लाट आली. त्यामुळे गेली दोन वर्ष मुख्यमंत्री दालन जवळपास बंदच होते. उद्धव ठाकरे हे वर्षा आणि सह्याद्री अतिथीगृहातून कारभार करत होते. कोरोनाची लाट ओसरली तरी तब्येतीच्या कारणास्तव ठाकरे हे मंत्रालयात आले नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री दालन उघडले जात नव्हते. अडीच वर्षानंतर आता मुख्यमंत्री दालनातून कामकाज होणार असून सहावा मजला गाजबजणार आहे.