सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग : देवेंद्र फडणवीसांची आमदारांसोबत बैठक | पुढारी

सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग : देवेंद्र फडणवीसांची आमदारांसोबत बैठक

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बुधवारी महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. आता  शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने  हालचाली सुरू केल्या आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.३०) भाजपच्या आमदारांसोबत बैठका सुरू केल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, भाजपच्या विधिमंडळ पक्षाचा नेता ठरविण्यासाठी  आज होणाऱ्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सत्तास्थापनेचा दावा देवेंद्र फडणवीस राज्यपालांकडे करतील.

आता नवीन मंत्रीमंडळात कोणाला स्‍थान मिळणार याची उत्‍सुकता शिगेला पोहचली आहे. भाजपचे 28 कॅबिनेट मंत्री, बंडखोर गटाचे ८ कॅबिनेट मंत्री आणि भाजप व बंडखोरांचे प्रत्येकी ५ राज्यमंत्री अशा ४६ जणांना मंत्रिमंडळ स्‍थान मिळण्‍याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ यादीला भाजप पक्षश्रेष्ठींची अंतिम मंजुरी मिळताच मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल.

नवीन मंत्रीमंडळातील संभाव्य मंत्री

भाजपमधून चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, संजय कुटे, रवींद्र चव्हाण, बबनराव लोणीकर आदींना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रकाश आवाडे, विनय कोरे यांच्या नावांचाही विचार होऊ शकतो. बंडखोर गटातून एकनाथ शिंदे यांच्यासह उदय सामंत, भरत गोगावले, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, संजय राठोड, शंभुराज देसाई, तानाजी सावंत आदी नावांचा मंत्रिमंडळात समावेशासाठी विचार होण्याची शक्यता आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button