महानगरपालिकांच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी ३ जुलैपर्यंत मुदतवाढ | पुढारी

महानगरपालिकांच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी ३ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई – विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी असलेली १ जुलै २०२२ पर्यंतची मुदत आता ३ जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे.

प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या याद्या संबंधित महानगरपालिका, त्यांचे संकेतस्थळ आणि ट्रू- व्होटर मोबाईल ॲपवरही उपलब्ध आहेत. त्यावर १ जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत होती. परंतु ही मुदत आता वाढविण्यात आली आहे. त्यासाठी रविवार व शनिवारच्या सुट्टीच्या दिवशीदेखील आवश्यक ती व्यवस्था करण्यात येणार आहे.

महानगरपालिका कार्यालय किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या ठिकाणी आणि ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील हरकती व सूचना दाखल करता येतील. ट्रू- व्होटर मोबाईल ॲप ‘प्ले स्टोअर’वरून आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करता येईल. त्याआधारे प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत आपले नाव शोधून त्याबाबत हरकत असल्यास तीही दाखल करता येईल. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या ९ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येतील.

Back to top button