मुंबईला चला; राष्ट्रवादीच्या आमदारांना शरद पवारांचे आदेश | पुढारी

मुंबईला चला; राष्ट्रवादीच्या आमदारांना शरद पवारांचे आदेश

मुंबई : पुढारी वृत्तसेवा: महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठीची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे डावपेच सुरु झाले असून, त्यांनी आपल्या आमदारांना गुरुवारी (दि.३०) रोजी पहाटेपर्यंत मुंबईत हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेऊन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यामुळे बहुमत सिद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली होती. यानंतर राज्यपालांनी गुरुवारी याबाबत विशेष अधिवेशन बोलविण्याचे निर्देश दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सकाळी आपल्या सिल्वर ओक या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते. मात्र, शिवसेनेकडून कोणीही उपस्थित नव्हते. राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आवाहन देण्यासाठी शिवसेनेचे नेते कायदेशीर बाबींची पूर्तता करत असल्याने या बैठकीत उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगण्यात आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुप्रिया सुळे तर काँग्रेसकडून मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, सुनील केदार, नितीन राऊत हे यावेळी उपस्थित होते. या बैठकीत महाविकास आघाडीसमोर असलेल्या कायदेशीर पर्यायांवर चर्चा झाली. बहुमत चाचणी द्यावीच लागली तर त्याबाबत रणनीती आखण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर चर्चा

शिवसेनेचे बंडखोर १६ आमदारांना उपसभापती यांनी सदस्यत्व रद्द का करू नये याबाबत नोटीस पाठवली होती. मात्र, या विरोधात बंडखोर आमदार सर्वोच्च न्यायालयात गेल्याने ११ जुलैपर्यंत परिस्थिती जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर राज्यपाल यांनी बहुमत चाचणीचे आदेश दिले. राज्यपालांच्या देशाला सर्वोच्च न्यायालयात आवाहन देण्यासाठी कायदेशीर बाबींवर त्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. ही बैठक संपताच शरद पवार यांनी आपल्या आमदारांना मुंबईला येण्याचे फर्मान सोडले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button