पिंपरी: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पिंपरीतील मोरवाडी चौकात लावलेला फ्लेक्स शिवसैनिकांनी फाडून टाकला आहे. दरम्यान, नेमका हा फ्लेक्स कोणी लावला? शहरातील हा शिंदे समर्थक कोण? याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र, शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा व्यक्त केला आहे. सोमवारी संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी पदाधिकार्यांची बैठक घेत शहरात शिवसेना एकसंध असल्याचे स्पष्ट केले. बंडखोरांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, त्याच्या दुसर्याच दिवशी शहरामध्ये मोरवाडी चौकात एकनाथ शिंदे समर्थनात फ्लेक्स लागले.
शिंदे यांच्या समर्थनाचा फ्लेक्स पिंपरीत लागल्याचे समजताच गणेश आहेर, रोमी संधू, सय्यद पटेल, तुषार नवले, गोरख पाटील, प्रदीप दळवी आदी शिवसैनिकांनी हे पोस्टर फाडून टाकले. तसेच, या वेळी मुख्यमंत्री यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीदेखील करण्यात आली. सचिन अहिर सोमवारी शहरात येऊन गेले असताना त्याच्या दुसर्याच दिवशी फ्लेक्स लागल्याने ते नेमकं कोणी लावलं याची चर्चा सुरू झाली आहे.