रत्नागिरी: मंत्री उदय सामंतही कव्हरेज क्षेत्राबाहेर | पुढारी

रत्नागिरी: मंत्री उदय सामंतही कव्हरेज क्षेत्राबाहेर

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा: ‘जे दूर गेले त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे’, असे सांगणारे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हेही आता कव्हरेज क्षेत्राबाहेर आहेत. त्यामुळे मतदारसंघातील आपल्या सर्व पदाधिकार्‍यांना एकत्रित ठेवणारे उदय सामंत हे  गुवाहाटीला रवाना झाले असल्याचे समजते. ते एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरल्याने रत्नागिरीतील शिवसैनिकांच्या मनात चलबिचल निर्माण झाली आहे. उद्‍य  सामंत सुरतमार्गे चार्टर्ड प्लेनने गुवाहाटीला रवाना झाले असल्याचे समजत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर गेले चार-पाच दिवस उदय सामंत हे मुंबईतील वर्षा बंगला व मातोश्रीवर विविध चर्चांमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे आ. योगेश कदम यांच्या व्यतिरिक्त अन्य आमदार न गेल्याने दक्षिण रत्नागिरीचा शिवसेनेचा गड अभेद्य होता. ते मुंबईतील बैठकांमध्ये सहभागी असल्याने रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील शिवसैनिकही उत्साहात होते; पण त्यातच ‘मी  शिवसेनेतच आहे’ असे अखेरपर्यंत म्हणणारे मंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे गुवाहाटीला रवाना झाल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

शुक्रवारी रत्नागिरीतील पाली येथील निवासस्थानी आल्यानंतर सामंत यांनी कोणत्याच विकास कामांबाबत बैठका लावल्या नव्हत्या. सेनेतील ज्येष्ठ पदाधिकारी व राष्ट्रवादीतून त्यांच्यासोबत आलेल्या पदाधिकार्‍यांशी त्यांनी संपर्क साधत चर्चा केली. त्यामुळे विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी पाली येथील शांतीसदन या बंगल्यात चर्चेसाठी उपस्थित होते. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या बैठका सुरु होत्या. दरम्यान, मतदारसंघातील अनेक मान्यवरांशीही त्यांनी चर्चा केली.

शनिवारी मुंबईच्या दिशेने रवाना झालेले उदय सामंत आज चार्टर्ड विमानाने गुवाहाटीला रवाना झाल्‍याचे समजते. रविवारी सकाळपासून त्यांचा फोन कव्हरेज क्षेत्राबाहेर दाखवत होते. त्यांच्या स्वीय सहाय्यकांकडूनही काही माहिती हाती लागत नव्हती. अनेक कार्यकर्ते व तालुक्यातील पदाधिकारी त्यांच्या संपर्कात होते. दुपारनंतर वृत्तवाहिन्यांवर ना. सामंत गुवाहाटीला गेल्याचे दाखवण्यात आल्यानंतर मतदार संघात शांतता पसरली आहे. शिवसेनेचे तुरळक कार्यकर्ते शहर परिसरात चर्चा करताना दिसत होते.

हेही वाचा :

 

Back to top button