काँग्रेसच्या आमदारांबाबतचे ‘ते’ वृत्त निराधार; काँग्रेसचा खुलासा | पुढारी

काँग्रेसच्या आमदारांबाबतचे 'ते' वृत्त निराधार; काँग्रेसचा खुलासा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषद निकालानंतर शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करत बंडाचा झेंडा फडकावला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. या पाठोपाठ काँग्रेसचे ५ आमदार नॉटरिचेबल असल्याचे वृत्त आल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले होते. परंतु काँग्रेसचे सर्व आमदार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात असून आमदारांपर्यंत पोहोचत नसल्याबाबत जे काही वृत्त आहे, ते पूर्णपणे निराधार आहे, असे ट्विट प्रदेश काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्तही चुकीचे असल्याने ते त्यांच्या निवासस्थानावरून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असेही ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांबाबत होणाऱ्या चर्चांवर पडदा पडला आहे. त्याचबरोबर राज्यातील राजकीय घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेस हायकमांडने मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. ते राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, शिवसेनेतील बंडाळीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक घेतली. महाविकास आघाडी सरकार कोसळणार नाही, याची हमी देत त्यांनी आमदारांना दिलासा दिला असल्याचे समजते.

या बैठकीनंतर छगन भुजबळ म्हणाले की, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे बाहेर आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेने आपल्या आमदारांची बैठक बोलवून गटनेता नेमला असावा. शिवसेनेने गटनेता बदलला असला, तरी सरकारला काहीही धोका नाही. शिवसेनेचा अंतर्गत विषय असून एकनाथ शिंदे यांची मनधरणी होईल. तसेच सरकार अडीच- अडीच वर्षे असेल, असे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत ठरले नसल्याची माझी माहिती आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button