मुंबई : पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी सोमवार दि. 20 जून रोजी मतदान होत असून राज्यसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पोर्शभूमीवर महाविकास आघाडीची या निवडणुकीत कसोटी लागली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन असे महाविकास विकास आघाडीचे सहा उमेदवार रिंगणात आहेत, तर भाजपने पाच उमेदवार मैदानात उतरवले आहेत. संख्याबळाचा विचार केला तर, काँग्रेसचा एक आणि भाजपचे चार उमेदवार जिंकू शकतात. काँग्रेसला आपला दुसरा उमेदवार विजयी करण्यासाठी अतिरिक्त 8, तर भाजपला 17 मतांची गरज आहे. त्यामुळे अतिरिक्त मतांची बेगमी करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच आहे.
काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराला विजयासाठी किमान आठ मतांची आवश्यकता असून त्यासाठी शिवसेना आपल्याकडील चार अतिरीक्त मते काँग्रेसला देणार आहे. शिवसेनेकडे स्वतः ची ५५ मते असून ९ अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा आहे.
शिवसेनेचे दोन आमदार निवडून येऊन शिवसेनेकडे १२ मते शिल्लक रहात आहेत. यातून काँग्रेसला पहिल्या पसंतीची चार मते काँग्रेसला दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तर राष्ट्रवादीलाही पहिल्या पसंतीची दोन ते तीन मते शिवसेना देऊ शकते. शिवसेना दगाफटका होऊ नये म्हणून सचिन अहिर आणि आमशा पाडवी या आपल्या दोन्ही उमेदवारांना २६ ऐवजी प्रत्येकी २८ मतांचा कोटा देण्यात येणार आहे.
हेही वाचा