Live : विधान परिषद निवडणूक मतदान पूर्ण, आता निकालाकडे लक्ष | पुढारी

Live : विधान परिषद निवडणूक मतदान पूर्ण, आता निकालाकडे लक्ष

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज सोमवारी दि. २० जून रोजी मतदान झाले. विधान परिषद निवडणुकीसाठी २८५ उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला. शिवसेना- राष्ट्रवादीने आपआपल्या उमेदवारांना मताचा कोटा पूर्ण केला. आपआपल्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची मते देण्यात आली आहेत. तर तिसऱ्या पसंतीचे मते भाई जगताप यांना देण्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. राज्यसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची या निवडणुकीत कसोटी लागली आहे. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत.

दहावी जागा काँग्रेसचे भाई जगताप की भाजपचे प्रसाद लाड जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का बसणार का, याबाबतही उत्सुकता आहे. सोमवारी सकाळी ९ ते ४ या दरम्यान मतदान झाले. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम दिलासा मिळाला नसल्याने दोघे मतदानापासून वंचित राहिले.

विधानपरिषद निवडणुकीत एक एक मत महत्त्वाचे आहे. त्यामुळे भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे आजारी असतानाही पुन्हा एकदा मतदान करण्यासाठी पुण्याहून मुंबईला आले होते. भाजपच्या पुण्यातील आमदार मुक्ता टिळक आजारी असतानाही पक्ष आदेश पाळून पुण्याहून मुंबईला मतदानासाठी आल्या होत्या. त्या मतदान करुन विधानभवनातून व्हिलचेअरवरुन बाहेर आल्या.

दरम्यान, पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन रात्री 8 ते 8.30 वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन असे महाविकास विकास आघाडीचे सहा उमेदवार रिंगणात आहेत, तर भाजपने पाच उमेदवार मैदानात उतरवले आहेत. संख्याबळाचा विचार केला तर, काँग्रेसचा एक आणि भाजपचे चार उमेदवार जिंकू शकतात. काँग्रेसला आपला दुसरा उमेदवार विजयी करण्यासाठी अतिरिक्‍त 8, तर भाजपला 17 मतांची गरज आहे. त्यामुळे अतिरिक्‍त मतांची बेगमी करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच आहे. जो उमेदवार 26 मतांचा कोटा पूर्ण करेल, तो जिंकणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे आपले उमेदवार निवडून येण्यासाठी पुरेशी मते आहेत.

उमेदवार

शिवसेना : सचिन अहिर, आमशा पाडवी
काँग्रेस : चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप
राष्ट्रवादी : रामराजे नाईक-निंबाळकर,
एकनाथ खडसे
भाजप : प्रा. राम शिंदे, प्रवीण दरेकर, उमा
खापरे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय.

Live अपडेट…

विधानपरिषद निवडणूक : शब्द म्हणजे शब्द! आमदार मुक्ता टिळक मतदान केल्यानंतर व्हिलचेअरवरुन जाताना…

  • दुपारी २ पर्यंत एकूण मतदान- २७५
  • शिवसेनेच्या सर्व आमदारांचे मतदान पूर्ण
  • दुपारी १ पर्यंत २४६ आमदारांचे मतदान
  • दुपारी १२ वाजेपर्यंतचे एकूण मतदान २०३ इतके झाले आहे.

शिवसेनेची रणनिती; मतदानासाठी आमदारांचे गट

विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना आमदार मतदान करण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दालनात जमले. त्यांचे विभागवार गट केले आहे.  कोकणातील आमदारांचा गट प्रथम मतदानाला गेला आहे. मुख्यमंत्री हे आमदारांना भेटत नाहीत, म्हणून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक, आमदार नाराज असल्याची कुजबूज शिवसेनेमध्ये  होती. आज शिंदे सेनेच्या आमदारांसह विधान भवनात आले. पण या निवडणुकीची सर्व सूत्रे मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या हातात घेतली आहेत. आमदारांना ते मार्गदर्शन करत आहेत. तसेच परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडून आमदारांना सूचना केल्या जात  आहेत.

  • भाजपच्या ८५ आमदारांचे मतदान झाले आहे. राष्ट्रवादीच्या ४५ आमदारांनी मतदान केले

मुक्ता टिळक देखील विधानभवनाकडे

भाजपच्या पुण्यातील आमदार मुक्ता टिळक या थोड्याच वेळात विधानभवनात दाखल होत आहेत. त्या सकाळीच पुण्याहून निघाल्या आहेत. आजारी असतानाही पक्ष आदेश पाळणे आपले कर्तव्य असल्याचे टिळक यांनी स्पष्ट केले होते.

लक्ष्मण जगताप मतदानासाठी मुंबईसाठी रवाना!

विधानपरिषद निवडणुकीत एक एक मत महत्त्वाचे आहे. त्यामुळे भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे आजारी असतानाही पुन्हा एकदा मतदान करण्यासाठी पुण्याहून मुंबईला निघाले आहेत.

गोंधळ नको म्हणून मतदान लवकर उरकून घेण्याची भाजपची रणनीती

राज्यसभा निवडणुकीमध्ये मतदान करताना आक्षेपांचे राजकारण रंगले होते. या निवडणुकीमध्ये असा प्रसंग येऊ नये म्हणून भाजपने सुरुवातीलाच आपले मतदान उरकून घेण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या मतदानामध्ये भाजपचे आमदार सर्वाधिक आहेत.

राज्यसभा निवडणुकीत मतदानाच्या शेवटी भाजपने मंत्री जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि आमदार सुहास कांदे यांनी अधिकृत प्रतिनिधीपेक्षा अन्य लोकांना मतदान दाखवून केल्याचा आक्षेप घेतला होता. तर महाविकास आघाडीने भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष रवी राणा यांच्या मताबद्दल तक्रार केली होती. आक्षेपांचे हे राजकारण चांगलेच रंगले आणि हा पेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला होता. अखेर त्यामध्ये शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे एक मत बाद झाले होते. असा प्रसंग टाळण्यासाठी भाजपने आपल्या आमदारांना सुरुवातीलाच मतदान करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आमदार मतदानाला जाताना देवेंद्र फडणवीस हे स्वतः मतदानाबाबत आणि पसंतीक्रमबाबत सूचना देत आहेत.

  • शिवसेनेचे आमदार विधानभवनात दाखल…

क्षितिज ठाकूर अमेरिकेतून मुंबईत दाखल, ‘बविआ’ची तीन मते ठरणार निर्णायक

ज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीतही आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची मते निर्णायक ठरू शकतात. या मतदानासाठी अमेरिकेत गेलेले आमदार क्षितीज ठाकूर हे मुंबईत दाखल झाले आहेत. ते दुपारी मतदानाला विधान भवनात पोहोचणार आहेत.

राज्यसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी भाजपला साथ दिल्याने शिवसेनेला पराभवाचा धक्का बसला. विधान परिषद निवडणुकीत भाजपला अतिरीक्त १७ मतांची गरज आहे. त्यामुळे यावेळीही भाजपने ठाकूर यांचे मन वळविण्याचा प्रयत्न. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्‍या उमेदवारांनीही ठाकूर यांची भेट घेतली; पण ठाकूर यांनी यावेळीही भूमिका स्पष्ट केली नाही.

आमदार क्षितीज ठाकूर हे अमेरिकेत असल्याने ते मतदानाला येणार नाहीत अशी चर्चा होती. त्यामुळे यावेळी बहुजन विकास आघाडीचे दोन मते मतपेटीत जाणार अशी चर्चा होती. मात्र आता क्षितीज  ठाकूर हे मुंबईत दाखल झाले आहेत. आणि ते आपला मतदानाचा हक्‍क बजावतील.

  • सकाळी १० पर्यंत ६८ आमदारांचं मतदान

शिवसेनेची पहिल्या पसंतीची चार मते काँग्रेसला?

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी सोमवार दि. 20 जून रोजी मतदान होत असून राज्यसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पोर्शभूमीवर महाविकास आघाडीची या निवडणुकीत कसोटी लागली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन असे महाविकास विकास आघाडीचे सहा उमेदवार रिंगणात आहेत, तर भाजपने पाच उमेदवार मैदानात उतरवले आहेत. संख्याबळाचा विचार केला तर, काँग्रेसचा एक आणि भाजपचे चार उमेदवार जिंकू शकतात. काँग्रेसला आपला दुसरा उमेदवार विजयी करण्यासाठी अतिरिक्‍त 8, तर भाजपला 17 मतांची गरज आहे. त्यामुळे अतिरिक्‍त मतांची बेगमी करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच आहे.

काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराला विजयासाठी किमान आठ मतांची आवश्यकता असून त्यासाठी शिवसेना आपल्याकडील चार अतिरीक्त मते काँग्रेसला देणार आहे. शिवसेनेकडे स्वतः ची ५५ मते असून ९ अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा आहे.

शिवसेनेचे दोन आमदार निवडून येऊन शिवसेनेकडे १२ मते शिल्लक रहात आहेत. यातून  काँग्रेसला पहिल्या पसंतीची चार मते काँग्रेसला दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तर राष्ट्रवादीलाही पहिल्या पसंतीची दोन ते तीन मते शिवसेना देऊ शकते. शिवसेना दगाफटका होऊ नये म्हणून सचिन अहिर आणि आमशा पाडवी या आपल्या दोन्ही उमेदवारांना २६ ऐवजी प्रत्येकी २८ मतांचा कोटा देण्यात येणार आहे.

विधानपरिषदेचा आखाडा सुरू; मतदानाला सुरुवात

सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. दोन-तीन दिवस पंचतारांकित हॉटेलमध्ये बडदास्त झाल्यानंतर आमदार मतदानासाठी विधानभवनात दाखल होऊ लागले आहेत. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन रात्री आठ पर्यंत निकाल स्पष्ट होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात आदी नेते विधानभवनात दाखल झाले आहेत. भाजप आमदारांना घेऊन चार बस पोहोचल्या आहेत. काँग्रेसला काही मतदानाची आवश्यकता असून सकाळी काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पहिल्या पसंतीची काही मते काँग्रेसला देण्याचे शिवसेनेने मान्य केले आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार भाई जगताप यांनी मतांचं गणित सुटेल, असा विश्वास मतदानापूर्वी व्यक्त केला.

दरम्यान कोणत्या उमेदवाराला किती मतांचा कोटा आहे याबाबत महाविकास आघाडीने गुप्तता पाळली आहे. भाजपला रणनीती आखण्याची संधी मिळू नये म्हणून सावधगिरी बाळगण्यात आली आहे.

शिवसेना आमदारांना वाहतूक कोंडीचा फटका, आमदारांना घेऊन विधानभवनाकडे जाणारी बस वाहतूक कोंडीत अडकली

आतापर्यंत १५ आमदारांनी मतदान केले आहे….

महाविकास आघाडीत एकजूट आहे. आघाडीतील नेत्यांचा एकमेकांशी व्यवस्थित संवाद सुरु आहे. आजची निवडणूक महत्वाची आहे. लोकशाहीला मालक निर्माण झाले आहेत-संजय राऊत

एकनाथ खडसे, वर्षा गायकवाड विधानभवनात दाखल

भाजपचे आमदार विधानभवनात दाखल

Back to top button