मुंबई, पुढारी ऑनलाईन: राज ठाकरे तुम्ही प्रबोधनकार ठाकरे यांचे रक्ताचे वारसदार असला तरी, आम्ही वैचारिक वारसदार आहोत, अशी टीका संभाजी ब्रिगेडने केली आहे. हिम्मत असेल तर चर्चेला या असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
बाबासाहेब पुरंदरेंसदर्भात केलेल्या वक्तव्यावरून संभाजी ब्रिगेड आणि राज ठाकरे यांच्यात टिका टिपण्णी सुरू आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी ठाकरे यांना आव्हान दिले आहे.
काही दिवसांपापूर्वी शेकापचे प्रवीण गायकवाड यांनी राज ठाकरे यांचे इतिहासाचे ज्ञान पुरंदरे यांच्यापलिकडे नाही, अशी बोचरी टीका केली होती.
त्यानंतर मनसेने गायकवाड यांना पुण्यात फिरू देणार नाही, असा इशारा दिला होता.
आखरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली आहे.
'राज ठाकरेंनी इतिहासासंदर्भात भाष्य केले. काहीही माहिती नसताना पुरुषोत्तम खेडेकर यांच्याविषयही काहीही वक्तव्य ठाकरेंनी केले.
महाराष्ट्रामध्ये इतिहासाचं विकृतीकरण थांबवून सामाजिक, शैक्षणिक धार्मिक द्वेषवादाचं उच्चाटन करण्याचे काम खेडेकर यांच्या विचारांच्या प्रबोधनातून झालं आहे.
सर्व बहुजन समाजामध्ये खेडेकर आणि त्यांच्या लिखाणाबद्दल आदर आहे. राज ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंचे रक्ताचे वारस आहात मात्र,
त्यांच्या विचारांचे वारसदार होऊ शकला नाही.
हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे. आपण प्रतिगामी व्यवस्थेचे वाहक आहात,' अशी बोचरी टीका आखरे यांनी केली आहे.
'तुमच्यात जर हिंमत असेल तर तुम्हाला जे तुमचे खरे इतिहास अभ्यासक, संशोधक वाटतात त्यांना तुम्ही बोलवा आम्ही आमचे अभ्यासक आणि संशोधक बोलवून एक चर्चा घडवू.
आम्ही निश्चित सांगू शकतो की तुम्हाला सत्य इतिहासाचं दर्शन घडवू शकतो. तुम्हाला जे संदर्भ हवे आहेत ते सत्य आणि ऐतिहासिक संदर्भ देऊन आम्ही इतिहास मांडू. तुम्ही हिंमत दाखवा आणि चर्चासत्र बोलवा.
वायफळ चर्चा करू नका. उगाच जिभेवर आले ते बोलून महाराष्ट्राला वेठीस धरु नका.'
बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका करताना त्यांच्यामुळष महाराष्ट्रात दंगली घडल्या असा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या इतिहासामुळे महाराष्ट्रात दंगली घडल्या. राज ठाकरे ज्या लोकांचा इतिहास वाचताय त्यांच्या लिखानामुळेच महाराष्ट्रात दंगली घडल्या.
बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेले इतिहास लेखन हे दंगलीचं स्त्रोत पसरवणारे लेखन आहे. त्या माध्यमातूनच दंगली या महाराष्ट्रात झाल्या होत्या.
पण आपण जरी दंगली घडवत असला तरी संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवासंघाच्या विचारधारेमुळे या महाराष्ट्रातील दंगली थांबलेल्या आहेत.'