मुंबई : पुढारी वृत्तसेवा कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या अकरा हजारांवर पोहचली आहे. दररोज हॉस्पिटलमध्ये दाखल होणार्या रुग्णांची संख्या शंभराच्या घरात पोहचल्यामुळे सुमारे 500 पेक्षा जास्त रुग्ण विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. यातील सुमारे 20 ते 22 जण ऑक्सिजनवर आहेत मुंबई शहर व उपनगरांत कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला होता. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही दोनशेच्या खाली आली होती. मात्र पुन्हा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडाही वाढू लागला.
सध्या मुंबईत अकरा हजारांपर्यंत सक्रिय रुग्णांचीसंख्या पोहोचली असून हॉस्पिटलमध्ये दाखल होणार्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. सध्या सर्वाधिक 1200 सक्रिय रुग्ण अंधेरी पश्चिमेकडील भागात आहेत. वांद्रे पश्चिमेलाही 800 पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. चेंबूर व आजूबाजूच्या परिसरात सुमारे 600 पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे चाचण्यांची संख्या 30 ते 40 हजारपर्यंत वाढवण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र आजही दररोज जेमतेम 15 ते 16 हजार चाचण्या होत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दररोज नऊ ते दहा हजार नागरिकांचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे संसर्ग रोखणे शक्य होणार असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
हेही वाचा