कोरोनाबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी : मनसुख मांडवीय | पुढारी

कोरोनाबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी : मनसुख मांडवीय

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : अनेक राज्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत असून नागरिकांनी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी सोमवारी राज्यांचे आरोग्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठकीत मार्गदर्शन बोलताना सांगितले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मांडवीय यांनी हा संवाद साधला. सध्या ‘हर घर दस्तक – 2’ या नावाने लसीकरणाची मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेचा आढावादेखील मांडवीय यांनी यावेळी घेतला.

मांडवीय म्हणाले, काही राज्यांत कोरोना वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोरोना गेला असल्याच्या भ्रमात कोणी राहू नये. नागरिकांनी आधीसारखेच दक्ष राहून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय अंमलात आणावेत. ज्या भागात कोरोना वाढत आहे, तेथे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी विशेष लक्ष देऊन आवश्यक उपाय योजावेत. विशेषतः जिनोम सिक्वेन्सिंगवर काम करुन नव्या प्रकारचा विषाणू आलेला आहे का, याचा तपास करावा.

वेळेवर तपासण्या करण्यात आल्या तर कोरोना वेगाने होणारा प्रसार थांबविता येईल. आरोग्य मंत्रालयाकडून 1 जूनपासून ‘हर घर दस्तक 2.0’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. 12 ते 17 वयोगटातील मुलांच्या लसीकरणावर करण्यावर या मोहिमेत लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कॅम्पिंग करण्याचे निर्देश आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.

देशात कोरोनाचे नवे 8084 रुग्ण, 10 मृत्यू

देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य घट नोंदवण्यात आली आहे. रविवारी दिवसभरात 8 हजार 84 कोरोनाग्रस्तांची भर पडली. तर, 10 रुग्णांचा मृत्यू झाला. 4 हजार 592 रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. सोमवारी देशाचा कोरोनामुक्तीदर 98.68 टक्क्यांवर घसरला. तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर 3.24 टक्के आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर 2.21 टक्के नोंदवण्यात आला.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 4 कोटी 32 लाख 30 हजार 101 पर्यंत पोहोचली आहे. यातील 4 कोटी 26 लाख 57 हजार 335 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 47 हजार 995 पर्यंत पोहोचली आहे. दुर्दैवाने आतापर्यंत 5 लाख 24 हजार 771 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनाविरोधात सुरू केलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत 195 कोटी 19 लाख 81 हजार 150 डोस दिले गेले आहेत. यातील 3.51 कोटी पहिले डोस 12 ते 14 वयोगटातील बालकांना दिले आहेत. खबरदारी म्हणून आतापर्यंत 3 कोटी 89 लाख 35 हजारांहून अधिक बूस्टर डोस दिले आहेत. देशात आतापर्यंत 85 कोटी 51 लाख 8 हजार 879 कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील 2 लाख 49 हजार 418 तपासण्या रविवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

Back to top button