राज्यसभा निवडणूक : राष्ट्रवादीनेही मतांचा कोटा बदलला, संजय पवारांची चार मते कमी होण्याची शक्यता | पुढारी

राज्यसभा निवडणूक : राष्ट्रवादीनेही मतांचा कोटा बदलला, संजय पवारांची चार मते कमी होण्याची शक्यता

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; काँग्रेसनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रफुल्ल पटेल यांच्या मतांचा कोटा बदलला आहे. दगाफटका नको म्हणून पटेल यांना ४२ ऐवजी राष्ट्रवादी ४४ मते देणार आहे. त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे. एका उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीची ४१ मते लागणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आपल्या उमेदवारांना ४२ मते देऊन उर्वरित अतिरिक्त मते शिवसेनेच्या संजय पवार यांना देण्याचे ठरले होते. मात्र निवडणूकीतील चुरस पहाता काँग्रेसनंतर राष्ट्रवादीनेही आपल्या उमेदवाराला ४४ मते देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे संजय पवार यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून मिळणारी चार मते कमी होणार आहेत.

सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. सकाळी ९ वाजता मतदानाला सुरुवात झाली. राज्यसभेसाठी पहिल्या तासात ६० हून अधिक आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. तसेच आमचा विजय निश्चित असल्याचे भाजपच्या नेत्यांनी म्हटले आहे.

सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी आघाडी आणि भाजपकडे पुरेशी मते नाहीत. त्यामुळे दोघांची मदार छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांवर आहे. या निवडणुकीत अपक्षांची मते निर्णायक ठरणार असल्याने त्यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ आहे.

हेहा वाचलतं का? 

Back to top button