विधान परिषद निवडणूक : रामराजे नाईक- निंबाळकर, एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी | पुढारी

विधान परिषद निवडणूक : रामराजे नाईक- निंबाळकर, एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सभापती रामराजे नाईक- निंबाळकर आणि भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

भाजपा, शिवसेना आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांनी उमेदवार जाहीर केले असताना राष्ट्रवादीच्या यादी मात्र रखडली होती. यामुळे नेमकी कोणाला संधी मिळेल, याविषयी चर्चा सुरु होती. जयंत पाटील यांनी उमेदवारांची नावे जाहीर करून सदरची चर्चा थांबवली.

राज्यसभा निवडणुकीचे रणांगण तापले असताना 20 जूनला होणार्‍या विधान परिषद निवडणुकीच्या रणसंग्रामाची सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीने विधान परिषदेचे विद्यमान सभापती, सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे ना. निंबाळकर यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर संधी दिली आहे.

रामराजेंनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेतली होती. त्य़ानंतर आज (दि. 9) राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जाहीर झाली. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी 9 जूनला उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख पक्षांत उमेदवार निश्चित करण्यासाठी लॉबिंग सुरू झाले आहे. राष्ट्रवादीचे संख्याबळ पाहता दोन जागा निवडून जाणार आहेत.

रामराजे हे प्रदीर्घ काळ राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या बरोबर सक्रिय आहेत. विधान परिषदेचे सभापती म्हणून त्यांनी अत्यंत उत्तम कामकाज केले. सातारा जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर रामराजे ना. निंबाळकर यांचाच प्रभाव आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील अनेक सत्तास्थाने राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा रामराजेंना संधी देण्याचा निर्णय घेतला.

दुसर्‍या जागेवर विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे. शिवसेनेने संजय पवार यांच्या रूपाने एका जिल्हाप्रमुखाला राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. तर आमशा पाडवी यांच्या रूपाने शिवसेनेने दुसरा जिल्हाप्रमुख विधान परिषदेच्या रिंगणात उतरवला आहे.

Back to top button