

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha elections) भाजपच्या तीन उमेदवारांनी आज (दि.३०) अर्ज दाखल केले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत आज त्यांनी आपले अर्ज दाखल केले.
(Rajya Sabha elections) अर्ज दाखल केल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, भाजपचे तिन्हीही उमेदवार निवडून येतील. त्यामुळे घोडेबाजार रोखण्यासाठी शिवसेनेने उमेदवारी मागे घ्यावी.
धनंजय महाडिक यांनी अर्ज भरण्यासाठी जाण्यापूर्वी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी मी कायम सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. सिद्धिविनायकाच्या कृपाशीर्वादाने व सर्वांच्या साथीने ती संधी पुन्हा लाभेल, असा विश्वास त्यांनी ट्विट करत व्यक्त केला आहे.
भाजपचे संख्याबळ पाहता भाजपला राज्यसभेच्या सहापैकी दोन जागा सहज जिंकता येणार आहेत. पियूष गोयल हे केंद्रात मंत्री असल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार हे स्पष्ट होते. मात्र विनय सहस्त्रबुद्धे यांना वगळले जाणार असल्याची सुरुवातीपासूनच चर्चा होती. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने ही चर्चा खरी ठरवली. सहस्त्रबुद्धे यांच्या ऐवजी डॉ. बोंडे यांना उमेदवारी जाहीर केली. गोयल आणि बोंडे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी जाहीर करताच भाजपने माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती.
काँग्रेसकडून उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध कवी इम्रान प्रतापगढी यांना संधी देण्यात आली आहे. त्यांनी मुरादाबाद मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. त्यांना आता महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपेक्षेप्रमाणे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. पण भाजपने तिसर्या जागेसाठी धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर केल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. शिवसेनेने कोल्हापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे.
हेही वाचलंत का ?