mumbai murder : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा | पुढारी

mumbai murder : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना गोवंडीमध्ये घडली आहे. पत्नीने सुरुवातीला पती लोखंडी शिडीवरुन पडून जखमी झाल्याचा बनाव केला होता. मात्र, डॉक्टरांच्या तपासणीत चाकूने भोसकल्याचे स्पष्ट झाले आणि तिचा हा बनाव फसला. शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करुन पत्नीसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या  (mumbai murder) आहेत. इरफान ऊर्फ समशेर जमील शाह (वय ३५) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे.

(mumbai murder) मूळचा उत्तर प्रदेशातील फतेहपूरचा रहिवासी असलेला इरफान शाह हा कुटुंबासोबत गोवंडीतील बैंगणवाडीमध्ये राहत होता. इरफानचा पहिला विवाह झाला होता. त्यानंतर मे २०१९ मध्ये इरफानने गावाकडील त्याच्या ओळखीतील एका महिलेसोबत विवाह केला. तिला पहिल्या पतीपासून चार मुले होती. तर, तिला इरफानपासून एक मुलगा झाला. त्यामुळे इरफान हा तिच्यासह मुलांना घेऊन आठ महिन्यांपूर्वी मुंबईत आला.

इरफान हा केटर्सचे काम करत होता. तर त्याच्या या पत्नीला कपडयाचे कप बनविण्याच्या कारखान्यात काम मिळाले. कामाच्या ठिकाणी तिची ओळख आरोपी सदरे आलम याच्यासोबत झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. याची माहिती इरफान याला मिळाली होती. त्यामुळे इरफानने त्या दोघांनाही समज दिली होती. यावरुन इरफान आणि सदरे आलम यांच्यात वाद सुरु झाले.

इरफानने घर बदलले तरी दोघांच्याही भेटीगाठी सुरुच होत्या. त्यात सदरे आलम याने इरफानकडे त्याचा तीन वर्षाचा मुलगा आपल्याला देण्याची मागणी केली. मुलगा न दिल्यास त्याने इरफानला ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे इरफान याने मुलाला ओळखीच्या व्यक्तींकडे ठेवले. इरफानची बहीण रिहाना ही गावावरुन मुंबईत आल्यानंतर त्याने २१ मे रोजी मुलाला तिच्याकडे ठेवले. त्याच रात्री सदरे आलम हा इरफानच्या घरी आला होता. दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर सदरे आलम याने चाकूने भोसकून इरफानचा खून केला.
जखमी अवस्थेतील इरफानला त्याच्या पत्नीने उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

दरम्यान, रूग्णालयात नेल्यानंतर इरफानच्या पत्नीने सुरुवातीला तो लोखंडी शिडीवरुन पडून जखमी झाल्याचे डॉक्टरांना सांगितले होते. मात्र, इरफानला चाकूने भोसकल्याच्या जखमा दिसत असल्याने रहिना हिने तिला विचारणा केली असता ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. अखेर रिहाना हीने इरफान राहत असलेल्या परिसरात जाऊन चौकशी केली असता घडलेला प्रकार तिला समजला. त्यानंतर तिने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून इरफानच्या खूनप्रकरणी त्याची पत्नी आणि प्रियकर सदरे आलम विरोधात तक्रार दिली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button