राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित, 'हे' आहे कारण | पुढारी

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित, 'हे' आहे कारण

पुढारी ऑनलाईन डेस्क

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी स्वतः ट्विट करत याची माहिती दिली आहे. भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केला असल्याचे मनसेकडून सांगितले जात आहे.

राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांत भोंग्याच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी भोंग्यांवरून सरकारला अल्टिमेटम दिला होता. यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. दरम्यान, राज ठाकरेंनी ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केली होती. पण राज ठाकरेंच्या दौऱ्याला खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी आव्हान दिले होते. राज ठाकरेंनी अयोध्येत येण्याआधी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी, अन्यथा त्यांना अयोध्येत पाय ठेवून देणार नाही, असा इशारा बृजभूषण शरण सिंह यांनी दिला होता. यामुळे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर स्वतः राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करत असल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले आहे.

राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. याचा त्रास त्यांना एक ते दीड वर्षापासून जाणवत आहे. पायाच्या दुखण्यामुळेच राज ठाकरे पुणे दौरा अर्धवट सोडून माघारी परतले होते. आता या दुखण्याचा त्यांना त्रास जाणवत आहे. यामुळे राज ठाकरे पुण्यात डॉक्टरांचा सल्ला घेणार आहेत. त्यानंतर अयोध्या दौऱ्याची पुढील तारीख ठरवली जाणार असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.

मनसैनिकांकडून अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारीही सुरु झाली होती. अशातच उत्तर प्रदेशमधून मात्र राज यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध करण्यात आला होता. तरीदेखील राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्यावर ठाम होते. परंतु, आता मात्र, राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित केला असल्याची माहिती दिली आहे. राज ठाकरे यांनी ट्वीट करून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा केली. मात्र, त्याचवेळी या मुद्यावर सविस्तरपणे बोलण्यासाठी पुण्यातील सभेत येण्याचे आवाहन राज यांनी मनसे कार्यकर्त्यांना केले आहे.

Back to top button