पालघर : केळवा रोड परिसरातील ३०० अनधिकृत चाळींवर तहसीलदारांकडून कारवाई | पुढारी

पालघर : केळवा रोड परिसरातील ३०० अनधिकृत चाळींवर तहसीलदारांकडून कारवाई

पालघर; पुढारी वृत्तसेवा : पालघर तालुक्यातील केळवा रोड रेल्वे स्थानकाच्या पूर्व-पश्चिम भागात आदिवासी व सरकारी जागेवर बेकायदेशीर उभारण्यात आलेल्या चाळींवर बुधवारी (दि.१८) कारवाई करण्यात आली. ही कारवाई पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांनी केली आहे. दिवसभरात तीनशेच्या वर चाळी जमीनदोस्त करण्यात आल्या.

पश्चिम रेल्वेचे केळवा रोड हे एक अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. येथून मुंबई किंवा मुंबई उपनगर तसेच गुजरात येथे ये-जा करणे सहज शक्य होते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय येऊन त्यांनी मोठ्या चाळी उभारल्या आहेत. या बेकायदेशीर बांधकामाच्या विक्रीतून सर्वसामान्यांची होणारी फसवणूक महसूल विभागाने थांबवावी, अशी परिसरातील लोकांची मागणी होती. त्या अनुषंगाने झालेल्या या कारवाईमध्ये तीनशेच्यावर चाळी जमीनदोस्त करण्यात आल्या.

पालघर तहसीलदार सुनील शिंदे, मंडळ अधिकारी मनोहर वसावे, सफाळे मंडळ अधिकारी तेजल पाटील, सफाळे तलाठी किरण जोगदंड, केळवा रोड तलाठी अपेक्षा भोगटे यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या साह्याने कारवाई करण्यात आली.

Back to top button