अकरावी सीईटीत मराठी का नाही? | पुढारी

अकरावी सीईटीत मराठी का नाही?

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणार्‍या परीक्षेसाठीच्या अंतिम नोंदणीत इतर मंडळाच्या केवळ 36 हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, तर राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची संख्या 10 लाखांहून अधिक आहे. मग आता राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची संख्या लाखांत आणि इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ हजारात असताना मराठी विषय परीक्षेसाठी का नाही ? असा प्रश्न मराठीप्रेमी संघटना, पालक आणि मराठी शाळा संस्थाचालकांकडून विचारण्यात आला आहे.

अकरावी प्रवेशासाठी प्रथमच घेतल्या जाणार्‍या सीईटी परीक्षेसाठी राज्य मंडळासह इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग असेल या कारणास्तव या परीक्षेतून मराठी हा विषय डावलण्यात आला.

सीईटी परीक्षेत मराठी विषयाचा अंतर्भाव करावा यासाठी पुन्हा एकदा मराठी भाषाप्रेमी व मराठी शाळा संस्थाचालक संघाचे प्रतिनिधी यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. सीईटीमध्ये मराठीला स्थान देण्याची मागणी केली आहे; मात्र सरकारने विचार करण्याची गरज आहे, मात्र दुर्लक्ष होत आहे, मराठीसाठी भूमिका नसल्याचेच मराठी शाळा संस्थाचालक संघाचे समन्वयक सुशील शेजूळ यांनी म्हटले आहे.

सीईटी परीक्षेत मराठीला स्थान मिळावे याच्या समर्थनार्थ राज्यभर नोंदणीत अडीच हजार लोकांनी नोंदणी करून याला प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

मराठी अभ्यास केंद्र संलग्न, मराठी शाळा संस्थाचालक संघ,महाराष्ट्र, मुंबई (बृहन्मुंबई) माध्यमिक (उच्च माध्यमिक) शाळा मुख्याध्यापक संघटना, मराठी शाळा टिकवल्याच पाहिजेत फेसबुक समूह, मराठी एकीकरण समिती, मी मराठी व्यावसायिक एकीकरण समिती, महाराष्ट्र संरक्षण संघटना, मराठी शाळा व भाषा संरक्षण, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, मराठीप्रेमी पालक महासंघ या सर्व संघटनांनी आपला पाठिंबा दिला आहे. मात्र सरकार मात्र याचा विचार करत नसल्याचे मराठी भाषाप्रेमी यांची तक्रार आहे.

राज्य मंडळाच्या मराठी असो किंवा इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी व मराठी हे दोन्ही विषय अभ्यासाला असतात, मग एकाच विषयाला सीईटी परीक्षेत प्राधान्य का असा प्रश्न पालक विचारत आहेत. नोंदणी केलेल्या मुंबई, पुण्यातील विद्यार्थी वगळता अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील असून परीक्षेत मराठी विषयाचा समावेश नसणे हे त्यांच्यासाठी अन्यायकारक आहे.

Back to top button