सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी स्वतंत्र यंत्रणा हवी : गृहमंत्री वळसे-पाटील | पुढारी

सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी स्वतंत्र यंत्रणा हवी : गृहमंत्री वळसे-पाटील

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : सोशल मीडियाचा वापर संयमाने व्हायला पाहिजे, त्यावर नियंत्रण ठेवणारी स्वतंत्र यंत्रणा हवी, असे मत राज्‍याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज व्यक्त केले. धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन त्‍यांनी पत्रकार परिषदेत केले.

यावेळी वळसे-पाटील म्‍हणाले, पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आमने-सामने आले हाेते. महिलांना मारहाण करणे निंदनीय बाब आहे. त्यामुळे यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची चूक असेल तरीही त्यांच्यावरही कारवाई होईल.

नाना पटाेले यांनी आपला शत्रू ओळखून जबाबदारीने काम करावे

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीची तक्रार काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. याबाबत वळसे-पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, महाविकास आघाडीत मतभेद आहेत, असे समजायचे कारण नाही, आघाडीत सारे काही आलबेल आहे. महाविकास आघाडी एक पक्ष म्हणून काम करत आहे. गोंदियातील निवडणूक हा स्थानिक मुद्दा आहे. त्याचा राज्य स्तरावर परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले. नाना पटोले एका पक्षाच्या राज्‍याचे प्रदेशाध्‍यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी जबाबदारी आणि सामंजस्याने भूमिका घेतली पाहिजे. आपला शत्रू कोण आहे, ते पाहून जबाबदारीने काम केले पाहिजे, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.

राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली जाईल

देशात भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकमेकांच्या तक्रारी करून ताकद वाया घालविण्यापेक्षा भाजपविरोधात लढले पाहिजे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यांच्या सभेला परवानगी मिळणार का ? या प्रश्नांवर राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली जाईल, असे वळसे- पाटील यांनी सांगितले.

केतकी चितळे प्रकरणावर ते म्हणाले की, विकृत प्रवृतीचे समर्थन कुणीही करू नये, असे म्हणत त्यांनी भाजप आमदार सदाभाऊ खोत यांना टोला लगावला. साेशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांची मानसिकता काय आहे हे स्पष्ट होते. त्या लिखाणामधून मानसिकता दिसून येत आहे, असेही वळसे-पाटील म्‍हणाले.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button