चित्रा वाघ, ‘हनुमानाचे नाव ऐकून फक्त रावणच एवढा सूडाने पेटला असेल’ | पुढारी

चित्रा वाघ, ‘हनुमानाचे नाव ऐकून फक्त रावणच एवढा सूडाने पेटला असेल’

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राजद्रोहाच्या गुन्ह्यात अटकेनंतर जामीनावर बाहेर आलेल्या खासदार नवनीत राणा या मानदुखीच्या त्रासामुळे लिलावती रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. दरम्यान शुक्रवारी (दि. ६) भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी लिलावती रुग्णालायस भेट देऊन खा. नवनीत राणा यांच्या तब्बेतीची विचारपुस केली. या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी ट्वीट करत महाआघाडी सरकारवर टिका करत सदर भेटीचे फोटो समाजमाध्यमातून शेअर केले.

यावेळी ट्वीटच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी लिहले आहे, खासदार नवनीत राणा यांची आज लीलावती इस्पितळात भेट घेतली. एका महिला खासदाराला ठाकरे सरकारने दिलेली अमानवीय वागणूक ऐकून अंगावर शहारे आले व मनात संतापाचा डोंब उसळला. हनुमानाचे नाव ऐकून फक्त रावणच एवढा सूडाने पेटला असेल. नवनीत राणा एकट्या नाहीत आणि अबलाही नाहीत, हे सरकार ने विसरू नये.

ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी खा. नवनीत राणा यांच्या भेटीवेळचे फोटो देखिल शेअर केले आहेत. या ट्वीटद्वारे नवनीत राणा या एकट्या नसल्याचा इशारा मुख्यमंत्री ठाकरे व महाआघाडी सरकारला चित्रा वाघ यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्यावरुन निर्माण झालेल्या वादा नंतर आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. समाजात तेढ आणि शांतता भंग केल्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर देहद्रोहाचा कलम लावण्यात आले होते. नवनीत राणा यांना भायखळा तुरुंगात तर रवी राणा यांना तळोजा तुरुगात ठेवण्यात आले होते. बुधवारी न्यायालयाकडून राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मिळाला. पण, बुधवारी सायंकाळी पर्यंत न्यायालयाचे आदेश कारागृहात न पोहचल्यामुळे त्यांना बुधवारची देखिल रात्र तुरुंगातच काढावी लागली होती. यानंतर त्यांना गुरुवारी तुरुंगातून सोडण्यात आले.

खासदार नवनीत राणा यांना मणका आणि कंबरदुखीसह स्पॉन्डिलायसिसचा त्रास आहे. तुरुंगात असताना त्यांचा हा त्रास पुन्हा उद्भवला यामुळे नवनीत राणा या तुरुंगातून बाहेर येताच लिलावती रुग्णालयात दाखल झाल्या. शुक्रवारी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांची भेट घेऊन विचारपुस केली. तर गुरुवारी रवी राणा यांनी नवनीत राणा यांची रुग्णालयात भेट घेतली होती. रवी राणा यांना पाहताच नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले होते.

Back to top button