पुणे : मिलिंद एकबोटेसह दोघांना शहरात प्रवेश नाहीच | पुढारी

पुणे : मिलिंद एकबोटेसह दोघांना शहरात प्रवेश नाहीच

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिराजवळ पत्रकाचे वाटप करून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलींद एकबोटे यांच्यासह 20 जणांवर फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात मिलिंद एकबोटे व नंदकिशोर रमाकांत एकबोटे यांना न्यायालयाने जामीन मंजूर करताना शहरात (महापालिका हद्दीत) येण्यास आरोपपत्र दाखल करेपर्यत बंदी घातली आहे. या अटीशर्ती शिथिल करण्यासाठी पुन्हा न्यायालयात धाव घेतल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश शरयु सहारे यांनी त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे.

याप्रकरणी मिलींद एकबोटे, नंदकिशोर एकबोटे, सुनील तांबट, स्वप्नील नाईक, मुकुंद पाटोळे, वैभव वाघ यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिराजवळ एकबोटे यांच्यासह कार्यकर्ते जमले. त्यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारी पत्रके वाटली तसेच महाआरतीचे आयोजन केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये एकबोटे यांना जामीन मिळाला होता. परंतु न्यायालयाने त्यांची 50 हजारांच्या जामीनावर मुक्तता करताना त्यांच्यासह नंदकिशोर रमाकांत एकबोटे यांना आरोपपत्र दाखल होईपर्यंत पुणे महापालिकेच्या हद्दीबाहेरच थांबण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

त्याच बरोबर एकबोटे यांनी त्यांच्या राहण्याच्या पत्त्याबाबत फरासखाना पोलिसांना सुचित करावे, त्यांनी पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करू नये या अटींवर जामीन दिला होता. मात्र जामीन अटी शिथिल करण्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाला केलेल्या अर्जामध्ये त्यांनी त्यांना पाठीचे दुखणे असून त्यांना उपचारासाठी त्यांच्या डॉक्टरकडे जाता येत नसल्याचा मुद्दा त्यांनी अर्जात मांडला होता. त्यावर तपासअधिकार्‍यांनी त्यांच्या अटी शिथिल करण्यास विरोध केला. त्यांना घालून दिलेली अट शिथिल केल्यास ते पुन्हा वादातीत ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. तेथे एखादा कार्यक्रम घेतल्यास तेथे दोन समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यस्था बिघडण्याची शक्यता असल्याने त्याचा अर्ज फेटाळण्याची मागणी केली.

Back to top button