ठाणे : …अन् अश्रूंना मिळाली मोकळी वाट, बेपत्ता आईची झाली भेट | पुढारी

ठाणे : ...अन् अश्रूंना मिळाली मोकळी वाट, बेपत्ता आईची झाली भेट

कसारा (ठाणे) पुढारी वृत्तसेवा : गुरुवारी संध्याकाळी एक महिला मुबई नाशिक महामार्गांवरील कसाराजवळील उंबरमाळी येथे सकाळपासून फिरत होती. नंतर मंदिराजवळ बसून आहे त्यांच्या गळ्यात सोने आहे आणि त्या थोड्या मानसिक रुग्ण असल्याचा लक्षात आल्यावर आपत्ती व्यवस्थापन टीमचे उबरमाळी येथील सदस्य भरत धोंगडे यांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन टीम अध्यक्ष शाम धुमाळ यांच्याशी संपर्क केला. महिला असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन टीमच्या माध्यमातून संबंधित महिलेबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे आणि कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप गिते यांच्याशी संपर्क करून पोलिसांना माहिती देण्यात आली.

टीम सदस्य भरत धोंगडे आणि सुनील वाकचौरे यांनी संबंधित महिलेस उबरमाळी गावातील महिला द्वारकाबाई साबळे, सखुबाई घाटकर यांना सोबत घेऊन महिलेची विचारपूस करून गावाचे नाव विचारले महिलेने दिलेल्या माहिती नुसार पोलिसांना माहिती दिल्यानंतर महिलेचा फोटो आणि माहिती देण्यात आली. पोलिसांनी फोटो व माहिती कोल्हापूर ,आजरा येथील तहसीलदार, पोलीसपर्यंत यांना पाठवली असता रात्री उशिरा महिलेबाबत माहिती पोलिसांना उपलब्ध झाली. महिला आजरा तालुक्यतीलच असून त्या कल्याण येथून त्यांच्या बहिणीच्या घराजवळून हरविल्याची माहिती मिळाली.

कल्याण येथून सिमा तानाजी निऊगरे असे या महिलेचे नाव असून त्या महिला २१ एप्रिलपासून हरवल्या होत्या.  ही माहिती मिळल्यानंतर आजरा येथील संबंधित महिलेचे पती, मुलगा यांना आणि कल्याण येथे राहणाऱ्या नातेवाईकांना संपर्क करण्यात आला. शुक्रवारी दुपारी मिसिंग दाखल करण्यात आलेल्या पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि महिलेचे पती तानाजी निऊगरे ,मुलगा हेमंत आणि सुनील निऊगरे, भाचा महेंद्र खोराटे यांनी कसारा पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांची भेट घेतली.

हरवलेल्या आईला बघण्यासाठी पाणवलेल्या डोळ्यांनी मुलगा हेमंत यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. समोरच त्याला त्याची आई दिसली. आई व मुलगा यांची नजरेला नजर मिळताच दोघांनी हबरडा फोडत एकमेकांना मिठी मारली. आईने आपल्या २० वर्षीय मुलाला मिठी मारून जोरजोरात हबरडा फोडला. त्यावेळी महिलेचे पती तानाजी दुसरा मुलगा सुनील, भाचा महेंद्र यांच्यासह उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले. महिलेची ओळख पटल्यावर कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप गिते यांनी सदर महिलेस पती आणि मुलांच्या ताब्यात दिले.

यावेळी कसारा पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचारी बागुल, सानप, पोलस पाटील सुनील वाकचौरे, आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ विनोद आयरे, भरत धोंगडे, सखुबाई घोटकर, द्वारकाबाई साबळे उपस्थित होते. यावेळी महिलेच्या नातेवाईकांनी अश्रूपूर्ण डोळ्यांनी सर्वांचे आभार मानले.

स्थानिक महिलांनी केला एक रात्र सांभाळ

रात्रीच्या वेळी सदर महिला कुठेही बाहेर निघून जाऊ नये अथवा त्यांना काही इजा पोहचू नये, यासाठी उबरमाळीतील सखुबाई घोटकर आणि द्वारकाबाई साबळे यांनी पूर्ण रात्र सांभाळ केला. जेवण वैगरे देऊन त्याच्या सोबत रात्र काढली. सकाळी पुन्हा नाश्ता जेवण देऊन दुपारी कसारा पोलीस ठाण्यात आणून नातेवाईकाच्या ताब्यात दिले.

Back to top button