सिंधुदुर्ग; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 1 हजार 6 पाणी नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 71 पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत. ग्रामीण भागात सरासरी 7.06 टक्के एवढे दूषित पाण्याचे प्रमाण असल्याबाबतची बाब आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या मार्च महिन्याच्या पाणी नमुने तपासणी अहवालावरून जिल्ह्यात दूषित पाण्याचा प्रश्न अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात तपासण्यात आलेल्या एकूण 1 हजार 6 पाणी नमुन्यांपैकी 71 पाणी नमुने दूषित आढळले आहेत. ग्रामीण भागातील दूषित पाण्याचे प्रमाण पाहता सरासरी 7.06 टक्के एवढे आहे. दोडामार्ग तालुक्यात दूषित पाण्याचे प्रमाण (21.62 टक्के) अधिक आहे. या व्यतिरिक्त सावंतवाडी तालुक्यात 5.39 टक्के, वेंगुर्ला 14.58 टक्के, कुडाळ 10.76 टक्के, मालवण 2.59 टक्के, कणकवली 6.88 टक्के, देवगड 3.06 टक्के, वैभववाडी 8.62 टक्के एवढे दूषित पाण्याचे प्रमाण असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या दूषित पाणी तपासणी अहवालावरून जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रमाण अधिक आहे तर शहरी भागात दूषित पाण्याचे प्रमाण 0.89 टक्के एवढे असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरी भागात 112 पाण्याचे नमुने तपासण्यात आले. यामध्ये 1 पाणी नमूना दूषित आढळला आहे. तर ग्रामीण भागात तपासण्यात आलेल्या 1 हजार 6 पाणी नमुन्या पैकी दोडामार्ग तालुक्यात 37 पाणी नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 8 नमुने दूषित आढळून आले आहेत. तर सावंतवाडी तालुक्यात 167 पाणी नमुन्यांपैकी 9 दूषित, वेंगुर्ला तालुक्यात 48 पाणी नमुन्यांपैकी 7 दूषित, कुडाळ तालुक्यात 158 पाणी नमुन्यांपैकी 17 दूषित, मालवण तालुक्यात 193 पाणी नमुन्यांपैकी 5 दूषित, कणकवली तालुक्यात 247 पाणी नमुन्यांपैकी 17 दूषित, देवगड तालुक्यात 98 पाणी नमुन्यांपैकी 3 दूषित, वैभववाडी तालुक्यात 58 पाणी नमुन्यांपैकी 5 पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत.