मुंबई : पुढारी ऑनलाईन : हनुमान जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसाचं पठण करावं, अन्यथा मातोश्रीबाहेर बसून हनुमान चालिसा वाचणार, असे आव्हान आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त करत आमदार रवी राणा यांना आवाहन दिले. हिंमत असेल तर मातोश्रीवर येऊन दाखवा, असे आवाहन पेडणेकर यांनी आमदार राणा यांना दिले आहे.
मुख्यमंत्र्यांना सांगणारे तुम्ही कोण? असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला. यावेळी किशोरी पेडणेकर अपक्ष आमदार रवी राणा यांच्यावर भडकल्या. बालिश सल्ले देणं बंद करा, असं सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देणं बंद करा, असेही सुचवले. धार्मिक भावनेने सांगायचे असेल तर ते मुद्दामपणे तेढ निर्माण करतात, असेही त्यांनी नमूद केले.
मातोश्री हे त्यांचं वैयक्तिक कक्ष आहेत. त्यांनी त्यांच्या कक्षात काय करावं, काय नाही हे रवी राणा यांनी सूचवू नये, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.