यंदाच्या आर्थिक वर्षात दोन लाख किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले जाण्याचे उद्दिष्ट | पुढारी

यंदाच्या आर्थिक वर्षात दोन लाख किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले जाण्याचे उद्दिष्ट

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : सरत्या आर्थिक वर्षात केंद्र सरकारकडून १ लाख ४१ हजार १९० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आले होते. त्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात दोन लाख किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले जाण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. (National Highways)

पीएम गतीशक्ती योजनेचा आढावा घेणारी बैठक नुकतीच उद्योग आणि व्यापार मंत्री पियूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीत ही माहिती देण्यात आली.

विविध मंत्रालये आणि खात्यांच्या अखत्यारितील विद्यमान आणि प्रस्तावित पायाभूत सुविधा कामे वेगाने मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारने पीएम गतीशक्ती योजना हाती घेतलेली आहे. पायाभूत सुविधा कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन खात्याच्या (डीपीआयआयटी) लॉजिस्टिक विभाग सांभाळणार्‍या विशेष सचिवांनी सादरीकरण केले.

यावेळी मंत्रालयनिहाय झालेली विविध पायाभूत सुविधांची कामे आणि भविष्यातील कामांवर विचारविमर्श करण्यात आला. पेट्रोलियम मंत्रालयाने गत आर्थिक वर्षात 20 हजार किलोमीटर लांबीची गॅस पाईपलाईन टाकली असून चालू आर्थिक वर्षात 34 हजार 500 किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकली जाणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.

National Highways : एनपीजीची स्थापना

ऊर्जा मंत्रालयाकडून सरत्या वर्षात 4 लाख 54 हजार 200 किलोमीटर ट्रान्समिशन लाईनचे काम करण्यात आले होते. उद्दिष्टापेक्षा हे काम जास्त असल्याची माहितीही याप्रसंगी देण्यात आली.

गत आर्थिक वर्षात दूरसंचार खात्याकडून 33 लाख 997 किलोमीटर लांबीचे ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यात आले होते. चालू आर्थिक वर्षासाठी 50 लाख किलोमीटर लांबीचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

विविध मंत्रालये आणि खात्यांमार्फत सुरु असलेल्या कामांत ताळमेळ घालण्यासाठी इंटिग्रेटेड मल्टिमोडल नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपचीही (एनपीजी) स्थापना करण्यात आली आहे. पायाभूत सुविधा कामे करीत असताना संबंधित राज्य सरकारांची मदत घेतली जात आहे.

आतापर्यंत 25 राज्यांत विशेषाधिकार असलेली सचिवांची समिती नेण्यात आली असून 9 राज्यांत एनपीजी कार्यरत झाली आहे.दुसरीकडे 6 राज्यांत तांत्रिक सहकार्य समित्यांची स्थापना झालेली आहे. पीएम गतीशक्ती योजनेचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस रेल्वे मंडळाचे चेअरमन व्ही. के. त्रिपाठी यांच्या विविध मंत्रालयांचे सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Back to top button