पुढारी ऑनलाईन डेस्क
Gold Rate Today : ऐन लग्नसराईत सोने-चांदी दरात आज मंगळवारी तेजी दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने ४०९ रुपयांनी महाग झाले. यामुळे सोने प्रति १० ग्रॅम ५२,५८८ रुपयांवर व्यवहार करत होते. तर चांदीच्या दरातही मोठी वाढ होताना दिसत आहे. चांदीच्या दरात १ हजार रुपयांची तेजी दिसून आली. चांदीचा दर प्रति किलो ६८,३०५ रुपयांवर ट्रेड करत आहे.
दरम्यान, सराफा बाजारातही सोन्याने उसळी घेतलीय. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, मंगळवारी शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५२,६४५ रुपयांवर खुला झाला. तर चांदी प्रति किलो ६८,१५० रुपयांवर गेली आहे. याआधी सोमवारी शुद्ध सोन्याचा दर ५२,५१० रुपयांवर जाऊन बंद झाला होता. तर चांदीचा प्रति किलो दर ६७,६७२ रुपयांवर जाऊन बंद झाला होता.
आज मंगळवारी (Gold Rate Today) शुद्ध म्हणजे २४ कॅरेट सोने ५२,६४५ रुपये, २३ कॅरेट ५२,४३४ रुपये, २२ कॅरेट ४८,२२३ रुपये, १८ कॅरेट सोने ३९,४८४ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३०,७९७ रुपये होता.
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.