एक दिवस तुम्हाला आमच्यासमोर गुडघे टेकावे लागतील; संजय राऊतांचा भाजपविरोधात एल्गार ! | पुढारी

एक दिवस तुम्हाला आमच्यासमोर गुडघे टेकावे लागतील; संजय राऊतांचा भाजपविरोधात एल्गार !

मुंबई; पुढारी ऑनलाईन : प्रचंड शक्तीप्रदर्शनाने शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मुंबई विमानतळावर स्वागत करण्यात आले. यावेळी विमानतळावर बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भाजप आणि किरीट सोमय्यांवर कडाडून प्रहार केला. आमच्यावर कारवाया करून भाजपने कबर खोदली आहे, आम्हाला ठार मारलं, तरी आम्ही तुमचं राज्य येऊ देणार नाही, असा एल्गारच त्यांनी केला.

विक्रांत घोटाळ्यावरून त्यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्यांवर प्रहार केला. सोमय्यांच्या घोटाळ्यावरून राज्यसभा स्थगित करण्याची वेळ आली. भाजपचे खासदार सुद्धा घोटाळ्यावर बोलू शकले नाहीत. विक्रांतच्या पैशातून सोमय्यांनी मनी लाँड्रिंग केले. विक्रांत घोटाळ्याबाबत राज्यात नव्हे, तर देशात गुन्हे दाखल होतील असा दावाही त्यांनी केला.

आमच्यावर आलेलं संकट आम्ही संधी समजतो असे राऊत यावेळी म्हणाले. विमानतळावरून जंगी स्वागत झाल्यानंतर संजय राऊत घराच्या दिशेने रवाना झाले. घरी पोहोचल्यानंतर ते मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहेत. विक्रात प्रकरणात गुन्हा नोंद झाल्याने पुढील रणनीतीसाठी ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी भेट घेणार असल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे काल शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ईडी कारवाईचा मुद्दा उपस्थित केल्याचे सांगितले.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या घरावर धाडी टाकण्यात आल्या आहेत.जय राऊत हे ज्येष्ठ पत्रकार तसेच राज्यसभेचे खासदार आहेत,याची कल्पना पंतप्रधानांना दिली.राऊतांच्या घरी केंद्रीय यंत्रणेने केलेली कारवाई अन्यायकारक आहे. ८ ते १० एकर जमीन, फ्लॅट ताब्यात घेण्यात आले आहेत,हे पंतप्रधानांच्या निदर्शनात आणून दिल्याचे पवारांनी सांगितले.

यासंबंधी पंतप्रधानांची प्रतिक्रिया विचारली नाही. पंरतु,यावर ते गंभीरपणे विचार करतील आणि त्यावर काही तरी पावले उचलतील,अशी भावना पवारांनी व्यक्त केली. संजय राऊतांच्या विरोधात कारवाई करण्याची गरज काय होती? त्यांच्यावरील आरोप काय? ते केवळ सरकारच्या विरोधात बोलतात म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली का? असा सवालही पवार यांनी पत्रकार परिषदेतून उपस्थित केला.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे स्थिर आहे,हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल आणि पुढच्या निवडणुकीनंतर पुन्हा सत्तेत येणार,असा दावा देखील शरद पवार यांनी केला.

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमधील संघर्ष टोकाला गेला आहे. भाजपने ईडीच्या माध्यमातून आता मातोश्रीपर्यंत पोहोचण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे या संघर्षाला आता आणखी धार आली आहे. मुख्यमंत्र्याचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती जप्त केल्यानंतर संजय राऊत यांच्यावरही कारवाई झाल्याने भाजप आणि शिवसेनेमधील संघर्ष आणखी धारदार होण्याची चिन्हे आहेत.

हे ही वाचलं का ?

Back to top button