सातारा: अखेर मकरंदआबा ‘किसन वीर’च्या ‘फडात’ | पुढारी

सातारा: अखेर मकरंदआबा ‘किसन वीर’च्या ‘फडात’

वाई; पुढारी वृत्तसेवा: कार्यकर्त्यांमधून उठाव असल्याने लोकभावनेचा आदर करून आ. मकरंद पाटील यांना किसन वीर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवावीच लागेल, या ‘पुढारी’ने मांडलेल्या भूमिकेवर अखेर मंगळवारी वाई येथील कार्यकर्ते व कारखाना सभासदांच्या मेळाव्यात आ. मकरंद पाटील व नितीनकाका पाटील यांना शिक्कामोर्तब करावे लागले.

किसन वीर कारखान्याच्या निवडणुकीच्या फडात अखेर आ. मकरंद पाटील यांनी उडी घेतली असून कारखाना निवडणूक लढवण्याची घोषणाही त्यांनी केली. त्यामुळे 10 वर्षांनंतर किसन वीरच्या कुस्तीचा आखाडा पुन्हा एकदा रंगलेला दिसणार आहे.

किसन वीर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली तरी आ. मकरंद पाटील व नितीनकाका पाटील यांनी कोणतीच भूमिका घेतलेली नव्हती. दुसर्‍या बाजूने कारखान्याचे चेअरमन मदनदादा भोसले यांचे निवडणूक लढवणे निश्चित झाले होते. प्रतीक्षा होती ती आ. मकरंद पाटील व नितीनकाका पाटील काय निर्णय घेतात याची.

दरम्यानच्या काळात अनेक सभासदांनी ‘पुढारी’त येऊन कारखान्याला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणायचे असेल तर व किसन वीर आबांचे नाव जपायचे असेल तर आ. मकरंद पाटील व नितीनकाका पाटील यांनी ‘किसन वीर’च्या आखाड्यात उतरले पाहिजे. आम्हाला ते जाहीरपणे सांगता येत नाहीत. पण ‘पुढारी’ने ही भूमिका मांडली पाहिजे, असा आग्रह अनेक सभासदांनी धरला. ‘पुढारी’नेही सहकारातील खिलाडू वृत्ती जिवंत राहिली पाहिजे या हेतूने निवडणूक व्हावी, अशी आग्रही भूमिका मांडली.

कार्यकर्त्यांचा प्रचंड वाढलेला दबाव लक्षात घेऊन आ. मकरंद पाटील व नितीनकाका पाटील यांनी वाईच्या धनश्री मंगल कार्यालयात पाचही तालुक्यातील कार्यकर्त्यांचा व सभासदांचा मेळावा बोलवून मते आजमावून घेतली. त्यात बहुसंख्य कार्यकर्त्यांनी कारखान्याची निवडणूक लढावीच लागेल.

‘पुढारी’ने जी भूमिका घेतली आहे ती योग्य आहे, असे म्हणत आ. मकरंद पाटील व नितीनकाका पाटील यांना आखाड्यात उतरण्याचा आग्रह धरला. त्यानुसार आ. मकरंद पाटील यांनी सभासदांचे हित लक्षात घेवून सर्वांना बरोबर घेवून किसन वीर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

या मेळाव्याला जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, माजी जि. प. उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, दत्तनाना ढमाळ, बाळासाहेब सोळस्कर, बकाजीराव पाटील, माजी आमदार सदाशिव सपकाळ, वसंतराव मानकुमरे, राजेंद्रशेठ राजपुरे, अमित कदम, शशिकांत पिसाळ, प्रतापराव पवार, दिलीप पिसाळ, महादेव मस्कर, मनोज पवार, अनिल सावंत, अनिल जगताप, मकरंद मोटे, शामराव गाढवे, प्रदीप चोरगे, भारत खामकर, शशिकांत पवार, विक्रांत डोंगरे, सत्यजित वीर, एस. वाय. पवार, मंगेश धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. मकरंद पाटील म्हणाले, किसनवीर सहकारी साखर कारखाना हा जिल्ह्यातील सहकाराचा मानबिंदू होता. किसनवीर आबांनी मोठ्या दूरदृष्टीने शेतकर्‍यांच्या हितासाठी कारखाना सुरु केला. तात्यांनी कारखाना सोडला तेव्हा अवघे साडेसहा कोटीचे नियमित कर्ज होते. स्व. लक्ष्मणराव पाटील कारखाना मोळाच्या ओढ्यावर नेतील, त्यांना बेड्या पडतील अशा वल्गना करण्यात आल्या. गेल्या वर्षीचे शेतकर्‍यांचे 55 हजार कोटी देणं बाकी असताना तसेच कामगारांचे दोन वर्षे पगार नाहीत, तरी कोणीही त्यांना जाब विचारायला जात नाही.

आम्ही गेली अनेक वर्षे सांगत होतो मदन भोसले कारखाना बुडवतील पण लोकांनी विश्वास ठेवला नाही. परिरस्थिती बिकट आहे. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. कारखाना बुडवून उजळ माथ्याने फिरायला लाज कशी यांना वाटत नाही?, अशी खरमरीत टीका मदन भोसले यांच्यावर आ. पाटील यांनी केली.

निवडणूक तोंडावर आल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मदन भोसले यांनीच कारखान्याविषयी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यास भाग पाडले असून अजूनही शेतकर्‍यांची दिशाभूल सुरु आहे. गेल्यावर्षी सहकार मंत्र्यांना थकहमी द्यायला लावली म्हणून कारखाना सुरु झाला. यावर्षी शासनाने राज्यात कोणालाच थकहमी दिली नाही. आपल्या पापाचे खापर आमच्या डोक्यावर फोडायचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे.

नितीनकाका पाटील म्हणाले, सद्यस्थितीत शेतकर्‍यांची अवस्था बिकट आहे. मेळाव्याला लोकांचा उस्फूर्त प्रतिसाद पाहता कारखाना ताब्यात घेण्याची सर्वसामान्यांची तीव्र इच्छा आहे. कारखाना घेणे सोपे आहे. सत्तरच्या दशकात सुरु झालेला कारखाना उत्तम चालू होता. स्व. लक्ष्मणतात्यांच्या काळात 20 टक्के पर्यंत कामगारांना पगारवाढ दिली. 1996- 97 च्या दरम्यान 32 कोटीत कारखान्याची 10 मेट्रिक टनने गाळप क्षमता वाढवली. 2003 साली सत्तांतर झालं तेव्हा सात लाख 50 हजार पोती शिल्लक होती. शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांच्या धोरणामुळे साखरेचा भाव दोन हजारांपर्यंत दिला.

त्यावेळी शिल्लक साखरेचा फायदा विरोधकांना झाला. त्यावेळी कारखान्यावर फारसे कर्ज नव्हते. मदन भोसले यांनी साखर निर्यातीमध्ये साडेदहा कोटींचा घोटाळा केला. तुम्ही केलेल्या इतर प्रकल्पाचा शेतकर्‍यांना काही फायदा झाला नाही. ऑडिट न करता अहवाल छापला, असे अनेक गैरव्यवहार त्यांनी केले. खंडाळा कारखान्यावर 266 कोटींची देणी आहेत, असेही ते म्हणाले.

किसनवीरवर विविध बँकांची 352 कोटींची कर्जे व इतर 400 कोटींचा बोजा मिळून साडेसातशे कोटींची कर्जे आहेत. कारखान्यात अडीच कोटीची साखर शिल्लक आहे. तिन्ही कारखान्याची मिळून साडे सहाशे कोटी मालमत्ता व एक हजार कोटीची देणी आहेत. 22 महिन्यांपासून कामगार पगार न घेता काम करत आहेत. एक हजार टनामागे 10 वर्षे कटिंग करावे लागेल.

आमचं मदन भोसलेंशी कसलंही साटेलोटे नाही. तालुक्यातील ऊस तुटावा म्हणून जरंडेश्वर व शरयू यांच्या मागे लागून टोळ्या आणल्या. अजून सहा लाख टन ऊस शिल्लक आहे. आ. मकरंद पाटील व मी अनेक कारखान्याच्या मागे लागूनही टोळ्या मिळेना झाल्या. मार्चनंतर तिन्ही कारखान्यांवर जप्ती येईल तेव्हा भाग भांडवल शून्य होईल. बँका ताब्यात घेऊन लिलाव करतील किंवा भाडे तत्वावर देतील.

नितीन भरगुडे-पाटील म्हणाले, आ. मकरंद पाटील यांचे आर. आर. आबांसारखे नेतृत्व आहे. कारखान्यावर एक हजार कोटी कर्ज असले तरी मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याला पुन्हा उर्जितावस्था येईल. सक्षम उमेदवार काढा पण कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांसाठी हा कारखाना वाचला पाहिजे. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार व सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील हे आ. मकरंद पाटील यांचा शब्द खाली पडू देत नाहीत. राज्य शासनाने सहकार्य केल्यास कारखाना वाचू शकतो.

वसंतराव मानकुमरे म्हणाले, किसनवीर कारखाना चालवण्याची क्षमता नसताना प्रतापगड घेण्याची व खंडाळा कारखाना काढण्याची गरज नव्हती. घोटाळेबाज किसनवीरच्या विद्यमान अध्यक्षासह संचालकावर गुन्हे दाखल करा. यावर आमदार मकरंद पाटलांनी मार्ग काढावा.

यावेळी शशिकांत पिसाळ, सदशिव सपकाळ, प्रतापराव पवार यांनी मनोगतात आ. मकरंद पाटील यांनी सभासद शेतकर्‍यांच्या हितासाठी निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला.

प्रास्तविक प्रमोद शिंदे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कारखाना कार्यक्षेत्रातील विविध ऊसउत्पादक शेतकर्‍यांनी पोटतिडकीने भावना व्यक्त केल्या. ऊस उत्पादक शेतकर्‍यांची होणारी आर्थिक कोंडी याविषयी परखड मते मांडून कारखाना निवडणूक लढवण्यासाठी साकडे घातले.

उमेदवारीचा निर्णय नेते बसून घेतील : आ. पाटील

आ. मकरंद पाटील यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा करताना सर्वांना सोबत घेऊन लढणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, तिन्ही कारखाने सुरू करण्याचा यक्ष प्रश्न आहे. आपल्याला मार्ग काढावा लागेल. निवडणूक जिंकल्यावर मोठी जबाबदारी आहे. तुम्ही सोबत असाल तर थकहमी उभी करून कारखाना सुरू करू, जीवाचं रान करू. इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरून ठेवा. उमेदवारीचा अंतिम निर्णय जिल्ह्यातील नेते बसून घेतील.

Back to top button