Mankhurd Traffic Jam: मानखुर्दमधील वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण; १५ मिनिटांचा प्रवास ६ तासांवर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा संताप

Mankhurd Traffic Jam: सायन-पनवेल महामार्गवर मानखुर्द परिसरात झालेल्या क्रेन दुर्घटनेनंतर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली.
Mankhurd Traffic Jam
Mankhurd Traffic JamPudhari
Published on
Updated on

Mankhurd Traffic Jam: मुंबईतील सायन-पनवेल महामार्गवरील वाहतूक कोंडीमुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले. मानखुर्द परिसरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामादरम्यान क्रेन दुर्घटना घडल्यानंतर संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आणि मुंबईहून नवी मुंबई तसेच पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

सामान्यतः १५ ते २० मिनिटांत पार होणारं चेंबूर-मानखुर्द अंतर पार करण्यासाठी अनेकांना तब्बल पाच ते सहा तास रस्त्यावर अडकून राहावं लागलं. या अभूतपूर्व कोंडीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून सोशल मीडियावर प्रशासनाच्या नियोजनावर जोरदार टीका होत आहे.

क्रेन दुर्घटनेनंतर परिस्थिती बिघडली

मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्द परिसरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दोन उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. या कामासाठी मोठ्या यंत्रसामग्रीचा वापर केला जात होता. मंगळवारी रात्री उशिरा खोदकाम सुरू असताना एक मोठी क्रेन अचानक रस्त्याच्या मध्यभागी कोसळली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

यानंतर दुर्घटनाग्रस्त क्रेन हटवण्यासाठी प्रशासनाने बचाव आणि दुरुस्ती मोहीम सुरू केली. मात्र क्रेनचे वजन अत्यंत जड असल्याने ती हटवण्यासाठी आणखी मोठी क्रेन रस्त्यावर उभी करण्यात आली. त्यामुळे आधीच संथ असलेली वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

प्रवाशांचे हाल

या वाहतूक कोंडीत हजारो प्रवासी अनेक तास वाहनांमध्ये अडकून पडले. त्यामुळे अनेकांकडे पिण्याचे पाणीही नव्हते. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला.

विशेषतः मधुमेह आणि इतर आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी परिस्थिती अधिक कठीण झाली. अनेकांना टॉयलेट किंवा स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नव्हती. वाहने इतकी अडकली होती की मागे फिरून दुसरा मार्ग निवडणेदेखील शक्य नव्हते.

सोशल मीडियावर संताप

या घटनेनंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी प्रशासनावर नियोजनशून्यतेचा आरोप केला. मोठ्या प्रमाणात वाहतूक वळवण्याची योग्य व्यवस्था का करण्यात आली नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

काही प्रवाशांनी तर ही परिस्थिती “भयानक” असल्याचं म्हटलं. रस्त्यावर अडकलेल्या लोकांनी व्हिडीओ आणि फोटो शेअर करत आपली व्यथा मांडली.

Mankhurd Traffic Jam
Machine Collapse: उड्डाण पुलासाठी खोदकाम करणारे मशिन रस्त्यात कोसळले; पोलीस शिपाई संतोष चव्हाण यांचा जागीच मृत्यू

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही अडकल्या कोंडीत

या वाहतूक कोंडीचा फटका सोनाली कुलकर्णी यांनाही बसला. पुण्याकडे प्रवास करत असताना त्या जवळपास पाच तास मानखुर्द परिसरात अडकून पडल्या होत्या.

त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत परिस्थितीची गंभीरता सांगितली. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी प्रशासनाकडून स्पष्ट माहिती मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. “आम्ही पुढे जाऊ शकत नाही आणि मागेही फिरू शकत नाही. नेमकं काय सुरू आहे याची कोणतीच स्पष्ट माहिती मिळत नाही,” असं त्यांनी म्हटलं.

Mankhurd Traffic Jam
Mumbai Rain: मुंबईची तुंबई टाळण्यासाठी एआय मदतीला; आढवा बैठकीत आयुक्तांची माहिती

वाहतूक अखेर सुरळीत

दरम्यान, रात्री उशिरा प्रशासनाने दुर्घटनाग्रस्त क्रेन हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम पूर्ण केले. त्यानंतर हळूहळू सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र या घटनेमुळे मुंबईतील पायाभूत कामांच्या नियोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news