देवेंद्र फडणवीसांची पेन ड्राईव्ह मालिका सुरुच; आता नवा पेन ड्राईव्ह विधानसभेत सादर | पुढारी

देवेंद्र फडणवीसांची पेन ड्राईव्ह मालिका सुरुच; आता नवा पेन ड्राईव्ह विधानसभेत सादर

मुंबई; पुढारी ऑनलाईन : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ठाकरे सरकारवर कडाडून हल्ला सुरुच आहे. त्यांनी आज तिसरा पेन ड्राईव्ह विधानसभेत सादर करत पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. हा पेन ड्राईव्ह चौकशीसाठी गृहमंत्र्यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था यावरून ठाकरे सरकारेच वाभाडे काढले.

देवेंद्र फडणवीस मुंबई मनपातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेवर टिकेचे बाण सोडले. फडणवीसांनी पुन्हा एक पेनड्राईव्ह सादर करताना फॉरेन्सिक ऑडिटशिवाय आरोप करणार नाही असे ते म्हणाले. इसाक बागवान यांच्या बंधूंची त्यांच्याबाबत एक तक्रार करण्यात आली आहे. त्यांचं बारामती कनेक्शन असल्याचा आरोपही त्यांनी केला.

एकट्या बारामतीत यांची ४२ एकर जमीन असून एवढी जमीन अजित पवारांचीही नसेल. नसीर बागवान आणि इतर परिवाराच्या नावावर या जमिनी खरेदी केल्या असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मुंबईमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. मुंबई महापालिकेत जे सत्ता चालवत आहेत ते महापालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचं आणि ज्यांचा क्रमांक देशात आठवा आहे. त्यांचा फायनान्सियल रिसोर्स मॅनेजमेंटचा आकडा ४५ वर आहे. आपल्यापुढे नवी मुंबई, पुणे, नागपूरसुद्धा आहे. कशाप्रकारे महापालिकेचं बजेट लुटून नेण्याचं काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचं भाषण छोटं होतं पण छान होतं. ते म्हणाले की गरीब, गरजू, कामगारांना द्यायचं आहे पण इथं फक्त लुटीचं काम सुरु आहे. जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा, एकही सेंटर भ्रष्टाचारातून सुटलं नाही. यूएनने कौतुक केलं, कोर्टानं कौतुक केलं, पण हा भ्रष्टाचार, हे घोटाळे त्यांच्यासमोर जायला हवेत, असाही आरोप त्यांनी केला.

फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचं भाषण चांगलं होतं. मात्र देण्याच्या नावाखाली तुम्ही घेताय. मुंबई महापालिकेचं बजेट शिवसेने लुटलं. सफाई कामगारांच्या नावावर तुम्ही तुमच्या तिजोऱ्या भरल्या. कोरोनाकाळात मुंबईतलं एकही सेंटर भ्रष्टाचारातून सुटलं नाही. मुंबई मेली तरी चालले असे प्रशासन वागत आहे. यावर आम्ही बोललो तर आम्हाला शत्रू म्हणतात. मराठी माणसाला दैवत बनून लुट सुरू आहे. मुंबईतल्या माणसाच्या लक्षात आलंय की प्रेताच्या टाळूवरचं लोणी कुणी खाल्लं आहे. हायवे नावाच्या कंपनीला एकच उरलीय समजून कंत्राट दिलं. ही हायवे कंपनी पेंग्विन आणतात, पिंजरे बांधतात. साधा यांच्याकडे जीएसटी नंबर नाही. हे डिपार्टमेंटल स्टोर्सचा नंबर वापरतात, अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.

हे ही वाचलं का ?

Back to top button