राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांविरोधातील तक्रारीचा अहवाल प्रक्षप्रमुखांना देणार : श्रीरंग बारणे | पुढारी

राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांविरोधातील तक्रारीचा अहवाल प्रक्षप्रमुखांना देणार : श्रीरंग बारणे

जालना, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांकडून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची कामे होत नसल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांकडून केल्या जात आहे. मराठवाड्यातील बीड आणि जालन्यातही  अशीच काहीशी परिस्थिती आहे. त्यामुळे या तक्रारींचा अहवाल पक्षप्रमुखांकडे सादर करणार असल्याची माहिती मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. खासदार बारणे हे गेल्या तीन दिवसांपासून जालन्यात असून गुरूवारी (दि.२४) पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत. याबाबत शिवसेना कार्यकर्त्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याचा अहवाल पक्षप्रमुखांना सोपवण्यात येणार आहे. यावेळी बारणे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा उल्लेख टाळत त्यांच्यावर निशाणा साधला. औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव नामकरण करण्याबाबत मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडीत असणार्‍या सहकारी पक्षातील आमदारांच्या भाजप प्रेमाचा अहवाल स्थानिक शिवसेना नेत्यांकडून घेतला आहे. महाविकास आघाडीतील नेते एकत्रित बसून यावर निर्णय घेतील, असं सांगत स्थानिक काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांनाही बारणे यांनी टोला लगावला.

महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य असून देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सुरक्षित राज्य आहे. त्यामुळे मुलीला महाराष्ट्रात ठेवायला हवं की नको, हा प्रश्न पत्रकारांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना विचारायला हवा, असेही खासदार बारणे म्हणाले. माणूस बोलण्याच्या ओघात बोलून जातो, असं म्हणत आव्हाड यांच्या व्यक्ताव्याचा विपर्यास केला जात असल्याचेही बारणे म्हणाले. पक्ष वाढवण्याचा प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना अधिकार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांनी युती करायची की नाही? याचा निर्णय जिल्ह्या- जिल्ह्यातील स्थानिक नेते घेतील, असेही बारणे यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का ? 

पाहा व्हिडीओ : कशी घेऊयात कानाची काळजी | how to Care for your Ears Properly

Back to top button