

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : मटका किंग हत्या प्रकरण यातील धर्मेश उर्फ नन्नू नितिन शहा हा पोलिस रेकॉर्डवरील कुख्यात गँगस्टर आहे. या गुंडावर देशभरातील विविध पोलिस ठाण्यांतून हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरणासारखे अनेक गंभीर स्वरूपाचे १५ गुन्हे दाखल आहेत.
या आरोपीच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या हस्तकांनी कल्याणमध्ये बॅनर्स लावले आहेत. या गुंडाच्या बॅनर्सने कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनासह पोलिसांना खुले आव्हान दिले आहे.
कल्याणमधील कुख्यात गुंड तथा गँगस्टर धर्मेश शहा याचा बुधवारी (दि.२८) रोजी वाढदिवस होता.
या गुंडाच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देणारे बॅनर्स कल्याणात जागोजागी लावण्यात आले. मात्र, केडीएमटीच्या बस थांब्यावर या गुंडाचा बॅनर लक्ष वेधून घेत आहे.
हे बॅनर लावण्यासाठी त्याच्या हस्तकांनी कायदेशीर परवानगी घेतली आहे का? यापेक्षा केडीएमटीच्या बस थांब्यावर लावलेल्या बॅनरवर केडीएमसी प्रशासनाकडून कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात आहे का? यासारखे प्रश्न नागरिकांना पडत आहेत.
३१ जुलै २०२० राेजी कल्याण रेल्वे स्थानकासमोरील नीलम गेस्ट हाऊसच्या गल्लीत गुंड तथा मटका किंग मुनिया उर्फ जिग्नेश ठक्कर याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
गुन्हेगारी क्षेत्रात वर्चस्व तसेच आर्थिक वादातून आपल्या बालपणीचा मित्र मुनिया उर्फ जिग्नेश याला मारून धर्मेश शहा आणि त्याचा ड्रायव्हर कम बाऊन्सर जयपाल उर्फ जापान या दोघांनी अन्य २ साथीदारांसह पसार झाले हाेते.
मटका किंग जिग्नेशचा खून करून मुख्य शूटर धर्मेश शहा फरार झाला होता. पोलिस चकमकीच्या भितीने तो गुजरातला पळाला होता.
पोलिसांनी धर्मेश शहाच्या २९ ऑगस्ट रोजी गुजरातमधून मुसक्या आवळल्या. सध्या ताे तुरूंगात आहे.मात्र, त्याच्या हस्तकांनी कल्याण शहरात जागोजागी बॅनर लावले आहेत.
त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणारा एक बॅनर बिर्ला कॉलेजजवळ असलेल्या केडीएमटीच्या बस थांब्यावर लावण्यात आला आहे.
या बॅनरवर स्थानिक जागरूक रहिवाशांनी हरकत घेतली आहे.
कल्याण-डोंबिवलीत अनेक वादग्रस्त बॅनर्स लावले जातात. यात स्थानिक नेत्यासह गुंडांच्या बॅनर्सही समावेश असतो.
केडीएमसीकडून अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नाही.
शहरांचे विद्रुपीकरण करण्यात अशाच बॅनरबाजांचा मोठा वाटा आहे.
आता कल्याण शहरात गुंडाच्या वाढदिवसाचे बॅनर्स चर्चेचा विषय बनला आहे. मात्र, शहरभर झळकलेल्या कुख्यात गुंडाच्या बॅनर्सवर काय कारवाया केडीएमसी प्रशासनासह पोलिस करतात? याकडे कल्याणकरांच्या नजरा लागल्या आहेत.
केडीएमसीच्या उपायुक्त पल्लवी भागवत यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी हा विषय आपल्याशी संबंधित नसून केडीएमटीचे उपायुक्त दीपक सावंत यांच्याकडे असल्याचे सांगितले.
तर केडीएमटीचे दीपक उपायुक्त सावंत यांना विचारणा केली असता त्यांनी मात्र, या संदर्भात काही अधिक बोलू शकत नसल्याचे सांगून माहिती घेऊन कारवाई केली जाईल, असे म्हटले.तसेच प्रभाग अधिकारी कारवाई करतील असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचलंत का?