मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवजंयती सोहळा, राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिली शपथ | पुढारी

मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवजंयती सोहळा, राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिली शपथ

मुंबई; पुढारी ऑनलाईन : तिथीनुसार आज राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. मनसेच्या वतीने आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडत आहे. यावेळी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना शपथ दिली.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार आज सोमवारी २१ मार्च रोजी साजरी करण्यात येत आहे. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थितीत हा सोहळा पार पडत आहे. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यावर मनसेच्या वतीने हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. येथे ढोल ताशाचा गजर करण्यात आला. शिवरायांना वंदन करण्यासाठी शिवाजी पार्कवर मनसे कार्यकर्त्यांसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. यावेळी शिवभक्तांनी ‘शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष केला.

यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना शपथ दिली. आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शपथ घेतो की, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले स्वराज्य आबाधित ठेवण्यासाठी आम्ही निष्ठेने काम करत राहू. जातीजातीत विभागलेली समाज व्यवस्था मोडून काढू. महिलांना सुरक्षित वाटेल, असे वातावरण निर्माण करू. त्यांचा आदर राखू. युवकांना रोजगार मिळेल, सर्वांना आरोग्य व्यवस्था चांगली मिळेल, शहरे, गावे, सुंदर होण्यासाठी चांगली व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करू. भ्रष्टाचार नष्ट करू, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी कटिबध्द राहू, कामगारांना न्याय देऊ, स्वाभिमानी, स्वराज्य निर्माण करण्यासाठी आजन्म काम करत राहू, छत्रपतींचे आम्ही एकनिष्ठ मावळे आहोत याचा आम्हाला विसरणार पडणार नाही. अशी त्यांनी यावेळी शपथ दिली.

हेही वाचलंत का? 

Back to top button